वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदानानंतर शासनाने महाराष्ट्र राज्यात जादुटोणा विरोधी कायदा लागू केला. या कायद्याची सर्व सामान्यांना माहिती व्हावी म्हणून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमोर वाचन व्हावे, याकरिता विविध संघटनांच्यावतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनुसार, २० आॅगस्ट २०१३ ला डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या केल्यानंतर २४ आॅगस्ट ला मंत्रिमंडळाने एकमताने जादुटोणा विरोधी कायदा संमत करून राज्यपाल यांच्याकडे पाठविले. यानंतर २० डिसेंबरला दोन्ही सभागृहाने जादुटोणा विरोधी कायद्याचे विधेयक संमत करुन त्याला कायद्याचे स्वरूप दिले. कायद्यात १२ कलमे असून या कायद्याअंतर्गत आजमितीस महाराष्ट्रात १०० च्या जवळपास गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे. कायद्याच्या प्रसाराकरिता समितीने जादुटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी राज्यव्यापी यात्रा काढली होती. या कायद्याचा प्रसार करण्याकरिता ग्रामीण भागात काम करणे गरजेचे आहे. शासकीय यंत्रणा ग्रामीण भागात प्रभावी आहे. याकरिता जि.प. शाळा, माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कायद्याचा प्रसार करता येईल. यासाठी विविध शाळेत कायद्याचे वाचन अनिवार्य केले जावे. या उपक्रमात कायद्यातील १२ कलमात येणाऱ्या बाबीचे वाचन होईल. यामुळे बुवाबाजीचे प्रकार बंद होण्यास मदत होवून श्रम, वेळ, पैसा, लैंगिक शोषण कमी होईल. याकरिता शासनाने संपूर्ण राज्यात कायद्याचे सामुहिक वाचनाविषयी निर्णय घ्यावा. जिल्हाधिकारी यांनी वर्धा जिल्ह्यातील शाळांना २० आॅगस्ट ला विद्यार्थ्यांकडून जादुटोणा विरोधी कायद्याच्या १२ कलमांचे वाचन करण्याची सुचना द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र अनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, अविनाश काकडे, सुधीर पांगूळ, सत्यशोधक समाजाचे प्राचार्य जनार्दन देवतळे, नंदकुमार वानखेडे, गजू नेहारे, नितीन झाडे, अॅड. पुजा जाधव, किरण राऊत, सुनील सावध, जि.प सदस्य सुनिता ढवळे, डॉ. सिद्धार्थ बुटले, श्रेया गोडे, प्रकाश कांबळे, भरत कोकावार, सुधाकर मिसाळ, राजेंद्र ढोबळे, गौतम पाटील, नरेंद्र कांबळे, सारिका डेहनकर आदींची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)
जिल्ह्यात जादुटोणा कायद्याचे सामूहिक वाचन व्हावे
By admin | Updated: August 17, 2014 23:20 IST