मुख्य वनसंरक्षकांकडून पाहणी : पर्यटकांसह भाविकांनाही मिळणार सुविधाआकोली : जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या निसर्गरम्य ढगा भुवनाच्या विकास कामांना प्रारंभ होणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. पर्यटनाचा दृष्टीकोण डोळ्यापुढे ठेवून या स्थळाला ‘क’ दर्जा प्राप्त झाला. विकासाच्या दृष्टीने प्रयत्न होत नव्हते. या उपेक्षित स्थळाची वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करण्यात आली आहे. येथे पर्यटनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी.एस.के. रेड्डी, यांच्यासह उपवनसंरक्षक दिगंबर पगारे, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.टी. बोबडे यांना सोबत घेवून ढगा भुवन परिसराची पाहणी केली. सातपुडा रांगेत वसलेले ढगा भुवन हे पर्यटन व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. शाळांच्या सहली, भाविक व पर्यटकांमुळे हा परिसर गजबजलेला असतो. येथे चिमुकल्यांकरिता खेळण्याच्या सुविधा नाही. इतरही मुलभूत सोईसह पर्यटकांना ओढ राहावी. यासाठी येथे सुविधा नव्हत्या. आता पर्यटन विकास आराखड्यातून ढगा भुवनाचा विकास होवू घातला आहे.(वार्ताहर)इको टुरिझम, स्पोर्टस्, अॅडव्हेंचरला प्राधान्य इको टुरीझम, स्पोर्टस, अॅडव्हेंचरच्या दृष्टीकोणातून येथे सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शिवाय नदीवर पुलाची निर्मिती, चौरागडावर जाण्यासाठी पायऱ्या व सौर उर्जा पंपाद्वारे गडावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. ही सर्व कामे प्रस्तावित असून येत्या वर्षात ढगा भुवनाने कात टाकल्याचे दिसेल. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) रेड्डी यांनी येथील अधिकाऱ्यांशी व स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी मासोदचे सरपंच आनंद पांडे व वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
ढगा भुवनाच्या विकासाचे संकेत
By admin | Updated: February 2, 2016 01:51 IST