तक्रारीकडे दुर्लक्ष : जलजन्य आजार बळावण्याची शक्यता कारंजा (घा.) : येथील वॉर्ड क्रमांक १३ मध्ये काही भागात पिण्याच्या पाईप लईन कुजल्या असल्याने गटारातील घाण पाणी त्यात मिसळून नागरिकांना अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे या परिसरातील जन आरोग्य धोक्यात आले आहे. पाईन लाईन दुरूस्त करून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, अशा मागणीची लेखी तक्रार स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतचे प्रशासक तहसीलदार यांना केली. पण अद्यापही प्रशासकांनी पाईप लाईन दुरस्ती करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच आहे. येथील वॉर्ड क्र. १३ मध्ये नर्सेस क्वॉटरच्या बाजूला, मुख्य रस्त्यालगत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन आहे. या पाईप लाईनच्या बाजूला एका घरमालकाने सांडपाणी सोडण्यासाठी खोल खड्डा केला. मुख्य पाईप लाईन लिकेज असल्यामुळे या खोल खड्ड्यातील घाणेरडे सांडपाणी पाईपमध्ये शिरून पिण्याच्या पाण्यात पाणी दूषित होत आहे. त्यामुळे सदर पाणी आरोग्यास हानीकारक झाले असून परिसरात हागवण, कॉलरा, इत्यादी जीवघेण्या रोगाची सार्वत्रिक साथ निर्माण होवून जनआरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सदर गळकी पाईप लाईन दुरुस्ती करावी तसेच खोल खड्ड्यातील दूषित पाणी पाईप लाईनमध्ये जाणार नाही यासाठी उपाययोजना करून दूषित पाण्यावर पायबंद करावा याकरिता १५ दिवसापूर्वी नगरपंचायतचे प्रशासक तहसीलदार यांना स्थानिक नागरिकांनी सह्यानिशी निवेदन दिले. पण अनेक दिवस लोटूनही प्रशासकांनी या गंभीर समस्येकडे अद्यापही लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका वाढला आहे. सर्वाधिक आजार हे पाण्याद्वारे होत असतात. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणे हा त्यांना अधिकार आणि प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे प्रशासनाने या बाबीची दखल घेत पाईपलाईन दुरुस्ते करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)
दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By admin | Updated: November 28, 2015 03:11 IST