गणेश विसर्जनाची तयारी : कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख व्यवस्था हिंगणघाट : सध्या हिंगणघाट शहरात गणेशोत्सवानिमित्त आनंददायी व उत्साहाचे वातावरण आहे. बाप्पाच्या विसर्जनालाही दोनच दिवस उरले आहे. त्यामुळे सर्वत्र गणेश विसर्जनाचे वेध लागले असून विसर्जनाची लगबगही सुरू झाली आहे. गणेश विसर्जनाचा कार्यक्रम सुरळीतपणे व सुखरूप चार पडावा व त्या दृष्टीने त्याचे योग्य नियोजन व्हावे, या करिता नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे आणि मुख्याधिकारी अनिल जगताप, यांनी विसर्जन स्थळाची पाहणी करीत आवश्यक त्या सूचना केल्या. विसर्जनाकरिता जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांना जे जा करण्याकरिता कोणतीही अडचण होवू नये, तसेच वाहतूक कुठेही खोळंबू नये याकरिता रस्त्याच्या बाजूला असलेली काटेरी झाडे, झुडपे साफ करण्याच्या व रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्त्याचे सपाटीकरण व दुरूस्तीकरण करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे. त्याचप्रकारे गणेश विसर्जन काळामध्ये विद्युत व्यवस्था, चोख ठेवणे, प्रशिक्षित जलतरण पटूंची कुशल चमू तयार ठेवणे यासोबतच अग्नीशमन, बांधकाम व स्थास्थ विभागातील कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तैनात ठेवण्याचे आदेश देण्यात आले.शहरातील नागरिकांनी गणेशविसर्जन करताना कुठलाही गोंगाट होऊ नये व गणेश प्रतिमेचे विसर्जन शांततेत व्हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधितांना करण्यात आल्या आहे. नागरिकांनी सुद्धा कुठलीही गडबड वा गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी व पूजेचे साहित्य, गणेश प्रतिमेचे निर्माल्य नदीच्या पाण्यात न टाकता नगर परिषदेद्वारे ठेवण्यात आलेल्या निर्माल्य पेटीत टाकावे, तसेच नदीचा परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांनी सर्व जनतेला केले आहे. आकस्मिक सुविधांवर जोर देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)
नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी केले विसर्जन स्थळाचे निरीक्षण
By admin | Updated: September 26, 2015 02:16 IST