वर्धा : तलावाकरिता जमीन अधिग्रहीत केली. यावेळी मिळालेला मोबदला अत्यल्प असल्याचे कारण काढत शेतकऱ्याने वाढीव मोबदल्याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. यावर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्याला ८९ हजार ९३४ रुपये देण्याचा निकाल दिला. तरीही येथील विशेष भू-अर्जन विभागाच्यावतीने शेतकऱ्याला रक्कम मिळाली नाही. यामुळे सदर शेतकऱ्याने न्यायालयातून या कार्यालयावर शुक्रवारी जप्ती आणली. जप्तीच्या कारवाईकरिता शेतकरी व न्यायालयाचा बेलीफ कार्यालयात येताच सदर शेतकऱ्याला धनादेश देण्यात आला. यामुळे भू-अर्जन विभागावरील जप्तीची नामुष्की तुर्तास टळली. याबाबत थोडक्यात वृत्त असे की, आर्वी तालुक्यातील टेंभरी (परसोडी) येथे तलावाचे बांधकाम करण्यात आले. या तलावाकरिता येथील शेतकरी पुंडलिक साखरकर यांची पाच एकर शेती अधिग्रहीत करण्यात आली. जमीन अधिग्रहीत करताना जमिनीला एकरी १४ हजार रुपयांचा देण्यात आला. मात्र मिळालेला दर अत्यल्प असल्याचा आरोप करीत शेतकऱ्याने वाढीव दराकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत साखरकर यांनी एकरी ५० हजार रुपये दर देण्याची मागणी केली. या याचिकेवर निर्णय देत न्यायालयाने शेतकऱ्याला वाढीव दर देण्याचा निकाल दिला. न्यायालयाच्या काही नियमानुसार साखरकर यांची दोन प्रकरणे दाखल झाली. यात पहिल्या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला. निकाल देण्यास दोन वर्षांवा कालावधी झाला तरी भू-अर्जन विभागाच्यावतीने शेतकऱ्याला वाढीव रक्कम देण्यात आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने अखेर न्यायालयातून जप्ती आणली. जप्ती घेवून शेतकरी विशेष भू-अर्जन कार्यालयात येताच अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. न्यायालयाचा बेलिफ कार्यालयात आला त्यावेळी येथील अधिकारी एस. बी. जाधव यांनी वरिष्ठांशी चर्चा करून सदर शेतकऱ्याला आदेशात असलेल्या रकमेचा धनादेश निर्णय घेतला. सदर शेतकऱ्याला धनादेश देण्याच्या प्रक्रीयेला दुपारपासून सुरुवात झाली. यावेळी न्यायालयाचे बेलिफ सुनील मानवटकर यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
जप्ती येताच मिळाला धनादेश
By admin | Updated: November 8, 2014 01:35 IST