वर्धा : शासकीय गोदामात धान्य नसल्याने एपीएल धारकांना धान्याकरिता तीन महिन्यांपासून भटकंती करावी लागत आहे. अशात वर्धेत शासकीय धान्याची अफरातफर करणाऱ्या उमरी (मेघे) येथील स्वस्त धान्य दुकानमालकावर सेवाग्राम पोलिसांनी कारवाई केल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. या कारवाईत साखर, तांदुळ व इतर धान्य असा एकूण १ लाख १३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात राजू मारोतराव समर्थ रा. भामटीपुरा, वर्धा याला अटक करण्यात आली तर अनिल ठाकरे रा. धंतोली हा फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.वर्धेत शासकीय धान्याचा काळाबाजार होत असल्याचे या पूर्वी अनेक वेळा समोर आले आहे. शासकीय धान्य खासगी पोत्यात भरून त्यावर आपली मोहर लावून अनेक स्वस्त धान्य दुकानदार ते धान्य खुल्या बाजारात विकत असल्याचे समोर आले आहे. असाच प्र्रकार उमरी (मेघे) येथे होत असल्याची माहिती सेवाग्राम पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी धाड घातली असता राजू समर्थ हा शासकीय धान्य पोत्यात भरत असताना मिळून आला. यावेळी पोलिसांनी १३६ कट्टे तांदूळ, सहा कट्टे साखर व इतर धान्य जप्त करीत राजू समर्थ याला अटक केली. या कामात त्याला अनिल ठाकरे याचे सहकार्य असल्याचे सांगण्यात आले. यावरून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. पण अटक करण्याकरिता पोलीस गेले असता तो फरार झाला.(प्रतिनिधी)
स्वस्त धान्य दुकानदाराकडून शासकीय धान्याची अफरातफर
By admin | Updated: January 25, 2015 23:20 IST