वायगाव(नि.) : २0१४-१५ चा नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी व चौथीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्यस्तरावरील गटशिक्षणाधिकार्याचे पाच दिवसांचे प्रशिक्षण पुणे येथे नुकतेच पार पडले. अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने इयत्ता पहिली व आठवीर्यंत नवीन अभ्यासक्रमाचे शेड्यूल तयार केले आहे. त्याची अंमलबजावणी त्या त्या टप्प्याने करण्यात येत आहे. नवीन अभ्यासक्रमात ज्ञान संरचनावाद हा अभ्यासक्रमाचा पायाभुत दृष्टीकोण ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुलाचे शाळेबाहेरचे जग आणि शाळेतील शिक्षण यांचा समन्वय साधला आहे. तसेच जागतिकीकरणामधून उभी राहिलेली आव्हाने व भविष्यकाळातील आव्हानाचा विचार करून त्यांना समोरे जाण्याची क्षमता मुलामध्ये विकसित करणे या दृष्टीने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. शांततेसाठीच्या शिक्षणाची सुरवात आपसातील व्यक्तीत भांडने, आणि समस्या सुसंवादाने सोडवणे, अशा अनेक कृती उपक्रमाचा समावेश नव्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची माहिती गटशिक्षण अधिकार्यांना होण्यासाठी पुणे येथे पाच दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अवघ्या काही दिवसानंतर जिल्हा स्तरावरील प्रशिक्षण घेण्यात येणार असून त्या नंतर तालुका स्तरावरील प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे संबंधीत अधिकार्यांनी सांगितले. (वार्ताहर)
तिसरी व चौथीच्या अभ्यासक्रमात बदल
By admin | Updated: May 22, 2014 01:21 IST