पालिकेच्या सभेत गदारोळ : मदतीच्या मुद्यावरून खुर्च्यांची फेकाफेक सिंदी (रेल्वे) : गत पाच दिवसापासून गायींच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळावी याकरिता चंद्रशेखर बेलखोडे याने आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाचा सोमवारी पाचवा दिवस असताना पालिकेकडून तोडगा काढण्याकरिता पालिकेत विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत तोडगा निघाला नसल्याने काही नगरसेवकांनी खुर्च्यांची फेकाफेक केली. यानंतर या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गावकऱ्यांच्या मदतीने सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदविण्याकरिता प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ती गावभर फिरवून बसस्थानक चौकात त्याचे दहन केले. शेवटी निळकंठ घवघवे यांच्या हस्ते निंबू पाणी देवून चंद्रशेखरचे उपोषण सोडविण्यात आले. सविस्तर वृत्त असे की, शहरात सुरू असलेल्या चंद्रशेखरच्या आमरण उपोषणावर तोडगा काढण्याकरिता नगर पालिकेने सोमवारी विशेष सभा बोलाविली होती. ती सभा चांगलीच गाजली. सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्यांत गावातील स्वच्छता, उपोषण व द्यावयाच्या मोबदल्याबाबत सभागृहात चांगलीच तू तू मै मै झाली. यातच उपाध्यक्षाच्या चुकीच्या वक्तव्याने विरोधकांनी खुर्च्याची आदळआपट करून सभात्याग केला. सभागृहातून विरोधी गटाचे नगरसेवक थेट उपोषणस्थळी पोहचले. येथे उपस्थित नागरिकांना पालिकेच्या विशेष सभेमध्ये या उपोषणाबाबत व आर्थिक मोबदल्याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. त्यावरून उपस्थितांच्या भावनांचा उद्रेक होऊन सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा निषेध नोंदविण्याकरिता त्यांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून गावभर फिरवून ती बस्थानक चौकात जाळली. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी) नगराध्यक्ष व नगरसेविकेची जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसांना तक्रार ४शहरात चंद्रशेखर बेलखोडे यांच्या सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्याकरिता आठ नगरसेवकांच्या मागणीवरून पालिकेच्या सभागृहात सोमवारी दुपारी विशेष सभेचे आयोजन केले होते. यावेळी मदत देण्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना आशिष देवतळे, प्रविण सिर्सीकर यांच्यासह पाच नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे काचेचा ग्लास भिरकावला व खुर्च्यांची फेकाफेक केल्याची तक्रार नगराध्यक्ष सुनिता कलोडे यांनी जिल्हाधिकारी व सिंदी (रेल्वे) पोलिसात केली. अशीच तक्रार नगरसेविका मनिषा पेटकर यांनी पोलिसात केली. पोलिसांनी दोन्ही तक्रारी स्वीकारल्या आहेत.
सत्ताधाऱ्यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेने चंद्रशेखरच्या उपोषणाची सांगता
By admin | Updated: September 27, 2016 03:00 IST