हिंगणघाट येथे २५ तर देवळीत १० हजार क्विंटल कापसाची आवकहिंगणघाट/देवळी : जागा नसल्याचे कारण काढत जिल्ह्यात सीसीआयने कापूस खरेदी बंद केली होती. याचा लाभ उचलत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात कापूस खरेदी केला. दरम्यान जिल्ह्यातील देवळी व हिंगणघाट या कापूस संकलन केंद्रावर सोमवारपासून सीसीआयची खरेदी सुरू झाल्याने कापूस उत्पादकांची एकच झुंबड होती. आज हिंगणघाट येथे २५ तर देवळी येथे १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. यावेळी शेतकऱ्यांकडून हमीदराने कापूस खरेदी करण्यात आली. सीसीआयच्यावतीने देवळी व हिंगणघाट येथील कापूस संकलन केंद्रावर आठवड्यातील सोमवार, मंगळवार व बुधवार अशा तीन दिवस कापसाची खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. हिंगणघाट येथील केंद्रावर १ हजार ६५९ गाड्यांतून कापूस आला तर देवळी येथे दीड हजार गाड्या आल्या होत्या. आज खरेदी होणार असल्याने देवळी येथील बाजारात कालपासून शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. येथील बाजार समितीचा आवार तसेच यवतमाळ मार्ग गाड्यांनी खच्च भरल्यामुळे अपेक्षीत गोंधळ टाळण्यासाठी बाजार समितीच्यावतीने तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय कपास निगम (सीसीआय) ने देवळी केंद्रावरील खरेदीचे दिवस वाढवून तीन ऐवजी चार दिवस करण्यात यावे. तसेच ठरलेल्या प्रत्येक दिवशी तीन हजार ५०० क्विंटल ऐवजी पाच हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी बाजार समितीच्या सभापती मनोहर खडसे यांनी सीसीआय अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत केली. याप्रसंगी सीसीआयचे जनरल मॅनेजर यु.के. सींग अकोला, टेक्सटाईल कमिशनर कार्यालयातील अधिकारी डी.पी. शर्मा, देशपांडे, बाजार समितीचे सचिव लहू खोके व सीसीआयचे ग्रेडर पन्नालाल सींग यांची उपस्थिती होती.जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे), कांढळी, वडनेर या ठिकाणी सीसीआयचे केंद्र असून देवळी तालुक्यात देवळी व पुलगाव येथे कापसाची खरेदी सुरू आहे. या केंद्रावर सीसीआयच्यावतीने ४ हजार ५०, ४ हजार ९ व ३ हजार ९५० याप्रमाणे भाव दिला आहे. यामुळे शेकऱ्यांची गर्दी कायम आहे.(तालुका प्रतिनिधी/प्रतिनिधी)
सीसीआयची कापूस खरेदी सुरू
By admin | Updated: February 2, 2015 23:09 IST