शेतमालाचे नुकसान : विभागाला दुरूस्तीचा विसरपवनार : येथील धाम नदी प्रकल्पातून परिसरातील शेतकऱ्यांना पिकांना ओलिताकरिता पाणीपुरवठा केला जातो. यासाठी कालव्याची निर्मिती केली. मात्र कालव्याच्या दुरुस्तीकडे संबंधीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. याचा फटका पवनार येथील शेतकऱ्याला सहन करावा लागला. कालव्याला पाझर फुटल्याने त्यांच्या शेतात पाणी शिरले. यात शेतातील उभे पीक करपले आहे. येथील शेतकरी शालीक जर्नादन उमाटे यांचे शेत सर्वे क्रं. ८५५ हे शेत आहे. धाम मुख्य कालव्याचे पाणी पाझरल्यामुळे त्या क्षेत्रातील पूर्ण पीक करपून गेले. व शेताला अक्षरश: तळ्याचे स्वरूप आलेले आहे. सदर शेतकरी हा अल्पभूधारक असून त्याचेकडे उदरनिर्वाहाचे माध्यम फक्त शेती आहे. याबाबत उमाटे यांनी सिंचन शाखेकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने शासनाला लिहलेल्या पत्रात वारंवार तक्रारी करुन हा मुद्दा निकाली निघाला नसल्याने माझी मनस्थिती बिघडली आहे. यात माझ्या परिवाराचे कुठलेही नुकसान झाल्यास शासन जबाबदार राहील याचा उल्लेख केला तरीही प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही.(वार्ताहर)
कालव्याच्या पाझराने शेताला तलावाचे स्वरूप
By admin | Updated: December 18, 2015 02:43 IST