हिंगणीजवळील अपघात : भाच्याचा मृत्यू तर मामा गंभीर जखमीसेलू/बोरधरण : हिंगणी येथून जवळच असलेल्या बोरधरण मार्गावर कारने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडला. भरधाव कार एम.एच. ३१ ई.डी. ९०९ ही बोरधरकडून हिंगणीकडे जात होती. तर बंटी नरेश चिकराम (२२) रा. आर्वी हा दवाखाना आटोपून एम.एच. ३२ यू. ८४५८ क्रमांकाच्या दुचाकीने बोरधरण येथे जात होता. हिंगणीजवळ भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, दुचाकी सुमारे ३० ते ४० फुट फरपडत गेली. यात दुचाकीस्वार बंटीचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मामा ईश्वर वासुदेव कोवार रा. बोरी बोरधरण हा गंभीर जखमी झाला. मृतक बंटी हा आपल्या मामासोबत सकाळी हिंगणीला दवाखान्यात गेला होता. बोरधरण येथे परत जात असताना काळाने घात केल्याने बोरी गावात शोककळा पसरली आहे. सेलू पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. कारमध्ये किती व्यक्ती होते, ते जखमी झाले की पसार झाले, हे कळू शकले नाही. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
कारची दुचाकीला धडक, एक ठार
By admin | Updated: January 7, 2016 02:43 IST