मध्यरात्रीची घटना : तळेगाव (श्या.पंत) पोलिसांची कारवाईतळेगाव (श्या.पंत.): राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील अमरावती रोडवर असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान तळेगाव (श्या.पंत) पोलिसांनी केली. विमलेश जगदीशप्रसाद कुशवाह (३३) आणि सुधाकर भय्याजी नेहारे दोघेही रा. आर्वी अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, तळेगाव ठाण्याचे पोलीस कर्मचारी मुंगले, आतिश देवगीरकर व चालक चौबे हे गस्तीवर होते. रात्री ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान अमरावती मार्गावरील बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएमजवळ एक व्यक्ती त्यांना संशयास्पदरीत्या वावरताना आढळला. तसेच एटीएमच्या खोलीत आणखी एक इसम असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. पोलिसांची गाडी पाहून बाहेर असलेल्या व्यक्तीने पळ काढला. त्यामुळे लागलीच पोलीस शिपाई आतिश देवगीरकर यांनी पाठलाग करीत महामार्गावर त्याला गाठले. दरम्यान, रात्री गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक मुसा पठाण व पो. कॉ. अमोल वानखेडे हे घटनास्थळावर पोहोचले. दरम्यान एटीएम मशीनजवळ असलेला इसमही पळून गेला होता. पाठलाग करीत त्यालाही दत्त मंदिराजवळ पकडण्यात यश आले. दोघांवरही तळेगाव ठाण्यात भादंविच्या कलम ३८०, ५११, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला असला तरी चोरट्यांना रोकड चोरण्यात अपयश आल्याने ही घटना टळली.(वार्ताहर)
एटीएम फोडताना दोघांना अटक
By admin | Updated: December 17, 2015 02:05 IST