आर्वी : येथील साईनगर परिसरात दोन आठवड्यापूर्वी झालेल्या चोरीचा सुगावा लावत पोलिसांनी शुक्रवारी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सात लाख रुपये रोख नगदी व चोरीसाठी वापरलेले एक दुचाकी वाहन जप्त केले आहे.पोलीस सूत्रानुसार, साईनगर येथे २६ जानेवारीच्या सायंकाळी अरविंद नाखले तर २८ जानेवारीला भरदिवसा गौरखेडे यांच्या घरी जबरी धाडसी चोरी झाली होती. दोन्ही चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संदीप हिवाळे यांनी चोरीचा छडा लावला. मिळालेल्या माहितीवरून आरोपी हा अकोला येथे असल्याचे कळताच पोलिसांनी आर.टी.ओ. कार्यालयात जावून अट्टल घरफोड्या रशिदशहा हमीदशहा रा. मोहता मिलजवळ अकोला (४०) व दुसरा जावेद अली बरकत अली (३४) रा. पुलफैल वर्धा या दोघांना अटक केली. दरम्यान याच प्रकाराच्या घरफोड्या हिंगोली येथे झाल्या असल्याने या चोरीचा तपास करण्यासाठी आर्वी पोलिसांनी या दोघांना हिंगोली पोलिसाकडे सुर्पूद केले आहे. रविवारी या दोघांना परत आर्वीत आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई उपनिरीक्षक संदीप हिवाळे, सहायक एस.वाय. थोटे, नितीन रायलवार, आरीफ खान, सलाम कुरेशी, शेखर पाटील व सहकार्यानी केले.(तालुका प्रतिनिधी)
चोरीप्रकरणी दोघांना अटक
By admin | Updated: February 15, 2015 01:46 IST