दोन गंभीर : हिंगणघाट मार्गावरील घटना पोहणा: दोन दुचाकीत समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर गिमा टेक्सटाईल्सजवळ घडली. उमेश नत्थुजी इंगोले (२८) रा. सास्ती व वसंत झिले (५८) रा. येरला अशी मृतकांची तर हनुमान बावणे (४५) व अंकुश सातघरे (४७) रा. पोहणा अशी जखमींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सास्ती येथील उमेश इंगोले हे एम.एच.४० ई २८४५ या क्रमांकाच्या दुचाकीने पोहणा येथून वडकीकडे जात होते. तर वसंत झिले हे ए आर.६५८९ या क्रमांकाच्या दुचाकीने येरला येथून पोहणा येथे येत होते. दरम्यान गिमा टेक्सटाईल्स जवळील वळणावर दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या. यात उमेश इंगोले याचा जागीच मृत्यू झाला. तर वसंत झिले गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना मृत घोषित केले. बावणे व सातघरे हे गंभीर जखमी असून त्यांना उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून तपास सुरू आहे.(वार्ताहर)