सेलू : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान व विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र घोराड येथील बोरतिर्थ अद्याप विकासाच्या प्रतीक्षेत आहे़ बोर तिराचे सौंदर्यीकरणही अद्याप करण्यात आलेले नाही़ यामुळे बोर तिराचे सौंदर्यीकरण करावे आणि घाटाच्या बांधकामाला शासनाने प्राधान्य द्यावे, अशी मागणी भाविकांसह ग्रामस्थांनी केली आहे़संत केजाजी आणि संत नामदेव महाराज या दोन संतांच्या वास्तव्याने पावन झालेली घोराड नगरी विदर्भातील प्रतिपंढरपूरच आहे़ पुरातन भोसले कालीन विठ्ठल -रूखमाईचे भव्य मंदिर बोरतिरावर आहे़ शिवाय शासन दप्तरात तिर्थक्षेत्र म्हणून घोराडची नोंदही झालेली आहे़ गत काही वर्षांपासून शासनाच्या तिर्थक्षेत्र विकास निधीतून येथे कामे करण्यात आलीत; पण ज्या बोरनदीमुळे हे स्थळ तिर्थक्षेत्र झाले, ती बोरगंगा या विकासापासून दुर्लक्षित असल्याची खंत भाविक व्यक्त करीत आहेत़ बोर नदीच्या पात्रात हनुमंत व पुंडलिकाचे मंदिर आहे; पण गावातील सांडपाणी या नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने पाणी दूषित होत आहे़ उन्हाळ्याच्या दिवसांत नदीचा प्रवाह पूर्णत: बंद होतो़ त्यावेळी हे सांडपाणी नदीच्या पात्रात साचून राहते़ या स्थळी रामनवमी, कार्तिक यात्रा तसेच संत केजाजी महाराज व संत नामदेव महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाला दूरवरून हजारो भाविक येतात़ या बोरतिर्थाचे सौंदर्यीकरण करणे गरजेचे झाले आहे़ शिवाय घाटाचे बांधकाम केल्यास हे तिर्थक्षेत्र पर्यटनस्थळ होऊ शकते, अशी अपेक्षाही भाविकांसह ग्रामस्थ व्यक्त करतात़(शहर प्रतिनिधी)
बोरतीर्थाला सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा
By admin | Updated: February 22, 2015 01:53 IST