आकोली : बँक आॅफ इंडिया शाखा सुकळी (बाई) चे कार्यक्षेत्र मोठे आहे; पण बँकेत अपुरी जागा आहे़ शिवाय कर्मचारी ठेवीदारांना सौजन्याची वागणूक देत नाहीत. त्यामुळे ठेवीदारांनी आपला मोर्चा अलाहाबाद बँकेच्या येळाकेळी शाखेकडे वळविल्याचे दिसून येत आहे़सुकळी (बाई) शाखेचा विस्तार मोठा आहे़ कार्यक्षेत्रातील गावांची संख्या अधिक आहे; पण बँकेची इमारत खुपच कमी जागेत आहे़ बँकेत १० ते १५ ग्राहकही उभे राहू शकत नाही़ इतकी जागा तोकडी आहे़ रोखपालाचे काऊंटरवर तर केवळ एकच माणूस उभा राहू शकतो़ यामुळे बँकेत पैसे जमा करणाऱ्या ग्राहकाला ताटकळत उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो़ शाखा व्यवस्थापकाची वागणूक सौजन्याची असली तरी हाताखालील कर्मचारी ते सौजन्य दाखवित नाही़ परिणामी, ठेवीदार त्रस्त झाले आहेत़ कंटाळलेल्या ठेवीदारांनी आता कार्यक्षेत्राबाहेरील अलाहाबाद बँक येळाकेळी शाखेकडे धाव घेतली आहे़ कर्मचाऱ्यांनी वाबणुकीत बदल केला नाही तर कर्जदार शेतकरी, निराधारच बँकेत जातील काय, हा प्रश्नच आहे़ याबाबत जिल्हा कार्यालयापर्यंत तक्रारी पोहोचल्या असताना कर्मचारी स्वभाव बदलत नसल्याचे एकूण चित्र आहे़(वार्ताहर)
बीओआयच्या ठेवीदारांचा ओढा दुसऱ्या बॅँकेकडे
By admin | Updated: March 18, 2015 01:59 IST