उत्कृष्ट गायक व खंजेरी वादकही : मुंबई, दिल्ली, पुणे येथे झाला गौरव सचिन देवतळे ल्ल विरूळ (आकाजी) मनुष्याच्या शरीरामध्ये एखादा अवयव कमी असला तर काही गुण अधिक प्रखर असतात, असे म्हटले जाते. ही बाब येथील १३ वर्षांच्या मुलाने सिद्ध करून दाखविली आहे. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला हा बालक उत्कृष्ट तबला वाजवू शकतो. शिवाय गायन आणि खंजेरी वादनातही तो पारंगत असल्याने लौकिक प्राप्त करीत आहे. साहिल गजानन पांढरे, असे सदर मुलाचे नाव असून त्याच्या तबला वादनाने रसिकांना जणू वेडच लावले आहे. साहिलचे वय अवघे १३ वर्षे आहे. तो दोन्ही डोळ्यांनी जन्मत: आंधळा आहे. यामुळे समाजाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दुबळा आहे. घरी अठराविश्वे दारिद्र्य आहे. त्याला गायनाचा छंद जडला. या चिमुकल्या अंध साहिलच्या तबला वादन, गायन आणि खंजेरी वादनाचा सर्वत्र गौरव होत आहे. ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांना त्याने भुरळच घातली आहे. प्रत्येक अपंग, आंधळ्या व्यक्तींना एखादी ईश्वरी कला उपजत असते; पण घरची स्थिती अत्यंत बिकट आहे. अशा व्यक्तींना समाजात योग्य स्थान व व्यासपीठ मिळणे कठीणच जाते. यामुळे त्यांचा हिरमोड होतो आणि त्यांच्या कलेला वाव मिळत नाही. साहिललाही दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने व्यासपीठ मिळत नव्हते. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला साहिल अंध असल्याने आई-वडिलांनाही त्याची चिंता होती; पण त्याच्या अंगी असलेल्या विविध कलांमुळे तो हिरोच ठरला आहे. लहान वयातच त्याला राष्ट्रसंताच्या भजनाची आवड जडली. आज राष्ट्रसंतांची सर्व भजने खंजेरी वाजवून तो गातो आणि ती सर्व त्याला मुकपाठ आहेत. त्याच्या तबला वादनाच्या छंदाने तर सर्वांना वेडच लावले आहे. गायन, भजन, खंजेरी, हरिपाठ, भावगीत, भक्तीगीत हे सारे तो लिलया गातो. या कलेबद्दल विविध सामाजिक संस्थांनी त्याचा गौरव केला आहे. मुंबई, दिल्ली, पुणे या ठिकाणी त्याला गौरविण्यात आले. सध्या तो त्याच्या मामाकडे विरूळ (आ.) येथे राहत असून अमरावती येथे अंध विद्यालयात शिक्षण घेत आहे. या कलांच्या माध्यमातून तो समाज प्रबोधन करतो. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या साहिलला जग पाहता येत नाही; पण त्याच्या अंगी असलेल्या कला-गुणांची या समाजाला दखल घ्यावी लागली. वय कमी असले तरी आज तो आभाळाएवढा मोठा झाला, हे मात्र निश्चित! इश्वरीय देणगीचा तो ठरला धनी ४शरीरातील एखादा अवयव कमी असला वा कुठलेही अपंगत्व असले तर त्याच्या अंगी एखादा कलागुण अधिकचा असतो, असे म्हटले जाते. ही बाब येथील अंध साहिलने सिद्धच केली आहे. गायन, भजन, खंजेरी, हरिपाठ, भावगीत, भक्तीगीत हे सारे तो लिलया गातो. या कलेबद्दल विविध सामाजिक संस्थांकडून त्याचा गौरवही करण्यात आला आहे. अमरावती येथील अंध विद्यालयात शिक्षण घेणारा साहिल सध्या खरा हिरो ठरल्याचीच चर्चा गावात ऐकायला मिळत आहे.
अंध साहिलच्या तबला वादनाने साऱ्यांनाच लावले वेड
By admin | Updated: November 15, 2016 01:28 IST