वर्धा : जिल्ह्यातील चारही मतदार संघात अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. हिंगणघाटात भाजपचे समीर कुणावार यांनी एकतर्फी विजय संपादन केला. देवळीत अखेरच्या फेरीत ९४३ मतांची आघाडी घेत काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी चवथ्यांना विजय संपादन करून काँग्रेसचा गड कायम राखला, तर आर्वीत अटीतटीची लढत देत काँग्रेसचे अमर काळे यांनी काँग्रेसला गड परत मिळवून दिला. वर्धेत अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. पंकज भोयर यांनी विजयश्री खेचून आणली. या निवडणुकीत वर्धेत सुरेश देशमुख, आर्वीत दादाराव केचे आणि हिंगणघाटात अशोक शिंदे या विद्यमान आमदारांसह देवळीत माजी खासदार सुरेश वाघमारे यांना पराभवाला सामोरे जावे लागले, तर समीर कुणावार आणि डॉ. पंकज भोयर या नव्या चेहऱ्यांना जनतेने पहिल्यांदा विधानसभेत पाठविले आहेत. हिंगणघाटात समीर कुणावार यांनी ९० हजार २७५ इतकी विक्रमी मते घेऊन शानदार विजय संपादन करून शिवसेनेचा गड काबीज केला. शिवसेनेचे अशोक शिंदे मात्र चवथ्या स्थानावर फेकल्या गेले. एखाद्या उमेदवाराला मिळालेली ही या निवडणुकीतील सर्वाधिक मते आहेत. परिणामी इतर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अनामती जप्त झाल्या. २५ हजार १०० मते घेऊन बसपाचे प्रलय तेलंग दुसऱ्या क्रमांकावर राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे यांना यावेळी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना २३ हजार ८३ मते मिळाली. काँग्रेसच्या उषाकिरण थुटे यांना १२ हजार ६४५ मते घेऊन पाचव्या, तर ७ हजार ३०० मते घेऊन मनसेचे अतुल वांदिले यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.देवळीत अतिशय चुरशीचा सामना रंगला. शेवटच्या फेरीपर्यंत कोण निवडून येईल, याची उत्कंठा शिगेला पोहचली होती. सुरुवातीच्या पाच फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे हेवीवेट उमेदवार रणजित कांबळे आघाडीवर होते. नंतरच्या फेऱ्यांमध्ये भाजपाचे सुरेश वाघमारे यांनी मतांची आघाडी घेतली आणि ती १५ व्या फेरीपर्यंत कायम ठेवली. यानंतर मात्र २३ व्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी कमालीची घसरत गेली. त्यांच्याकडे केवळ ३०० मतांचीच आघाडी शिल्लक होती. २४ वी अंतिम फेरी शिल्लक होती. वाघमारे ही आघाडी कायम ठेवणार वा रणजित कांबळे मोठी उडी घेत विजय हिसकावून आणणार, अशी उत्कंठा वाढली होती. भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्तेही श्वास रोखून होते. अशातच अंतिम फेरीची मतमोजणी झाली तेव्हा रणजित कांबळे यांनी जोरदार उसंडी मारत ९४३ मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. हे लक्षात येताच काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
जिल्ह्यात भाजप-काँग्रेस समांतर
By admin | Updated: October 19, 2014 23:58 IST