लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची वर्धा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने जिल्ह्यात सध्या मुलींचा जन्मदर बऱ्यापैकी वाढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण विभागाने सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार वर्धा जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ९७९ असल्याचे नमुद करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, मागील अकरा महिन्यांत जिल्ह्यातील अकरा शासकीय तसेच विविध खासगी रुग्णालयात एकूण १४ हजार ३ महिलांची प्रसुती झाली. त्यापैकी ५ हजार ७४० महिलांची प्रसुती ही सीझर पद्धतीचा अवलंब करून करण्यात आली आहे. केवळ शासकीय रुग्णालयांचा विचार केल्यास मागील अकरा महिन्यात जिल्ह्यात २ हजार ११० मुली जन्माला आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील विविध भागात शासनमान्य खासगी सोनोग्राफी सेंटर असले तरी या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत गर्भाशयात असलेल्या बालकाचे लिंग तपासले जात नाही. उल्लेखनीय म्हणून गर्भाशयात असलेल्या बालकाचे लिंग तपासणे हे कायद्याने गुन्हा आहे. असे करणाऱ्यांना कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागू शकते. गरोदर महिलेला आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांसह डॉक्टरांकडून वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले जाते. शिवाय गरोदर महिलेने दररोज कुठला आहार घ्यावा याचीही माहिती डॉक्टरांकडून महिलांना दिली जात असल्याने सध्या कुपोषणालाही बऱ्यापैकी आळा बसल्याचे अधिकाऱ्यांच्या चौकशीत पुढे आले आहे.
वेळीच केले जातेय लसीकरणनोंदणी होताच गर्भवती महिलेला ‘टीडी’च्या लसीचा पहिली मात्रा तर एक महिन्याच्या अंतराने टीडीच्या लसीची दुसरी मात्रा देतात.
नवजात बालकाला २४ तासांच्या आत शुन्य एचबी, ओपीव्ही, बीसीजीची लस दिली जाते. बालक दीड महिन्यांचा झाल्यावर पेन्टा बॅनन्ट, ओरल पोलिओ, रोटा व्हायरस, आयटीव्ही लसीची पहिली मात्रा दिली जाते.
अडीच महिन्यानंतर बालकास पेन्टा बॅनन्ट, ओरल पोलिओ, रोटा व्हायरस लसीची दुसरी मात्रा दिली जाते. तर बालक साडे तीन महिन्याचा झाल्यावर पेन्टा बॅनन्ट, ओरल पोलिओ, रोटा व्हायरसची तिसरी मात्रा आणि आयटीव्ही लसीची दुसरी मात्रा दिली जाते. बालक नऊ महिन्याचा झाल्यावर एमआर आणि व्हिटायमीनची लस दिली जाते.
सन २०१५-१६ ला हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ९४७ होता. तर सन २०१९-२० या वर्षात एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ९७९ आहे. ही वर्धा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.