दोघे जखमी : व्हॅनमध्ये कोंबले होते १६ विद्यार्थी, निकष डावलून ने-आण आकोली : शासनाने स्कूल बससाठी ठरविलेले निकष डावलून विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ११ वाजता बस स्थानकावर घडला. राहुल गजानन इरखेडे (२१) व अनिकेत अंबादास इरखेडे (२०), असे जखमींची नावे आहे. श्रीकृष्ण हायस्कूल जामणीच्या मारूती व्हॅन क्र. एमएच ३१ डीव्ही ११७ मध्ये १६ विद्यार्थी घेऊन चालक ऋषभ कवडू लोहवे हा भरधाव जात होता. दरम्यान, आकोली गावातून साखर कारखान्याकडे जाणाऱ्या वळणावर दुचाकी क्र. एमएच ३२ एफ ६८५८ ला व्हॅनने धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाले. याबाबत पोलिसांना माहिती देत आॅटोचालक अनिल कुणघटकर, दिलीप पवार, दीपक नरताम व युवकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. दुचाकीस्वार घरी पाहुणे येत असल्याने आंजी येथे भाजी आणायला जात होते. सदर वाहन चालकाद्वारे यापूर्वीही अपघात झाले. यातील राहुल इरखेडेची प्रकृती चिंताजनक असून त्याला नागपूरला हलविण्यात आले. अपघातात काही विद्यार्थीही जखमी झाले. त्यांच्यावर आंजी (मोठी) येथील डॉ. विनोद बेले यांच्यामार्फत उपचार करण्यात आले. या प्रकरणी जमादार सुहास मडावी व बंटी ढोणे यांनी पंचनामा करीत दोन्ही वाहने जप्त केली.(वार्ताहर)
अवैध स्कूल वाहनाची दुचाकीला धडक
By admin | Updated: March 9, 2017 00:56 IST