लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या. पंत.): येथील महामार्गालगत असलेल्या मंगल कार्यालयासमोर वरातीची तयारी सुरू होती. यासाठी नवरदेवाकरिता घोडा बोलावण्यात आला होता तसेच एक कारही तेथे होती. अशातच महामार्गाने भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने या घोडा आणि कारला जबर धडक दिली. यामध्ये घोड्याला जबर इजा झाली असून, कारचेही मोठे नुकसान झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ११ वाजेदरम्यान झाला. तळेगाव येथील उदयनराज मंगल कार्यालयासमोर नवरदेवाच्या वरातीची तयारी सुरू होती. याकरिता तेथे घोडा बोलावण्यात आला होता तसेच सोबतीला एक कारही होती. दरम्यान, सुरतवरून नागपूरकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या जी.जे.१४ झेड २००० क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स चालकाने एम.ए. २९ बी.व्ही. ०३८३ क्रमांकाच्या कारला आणि नवरदेवाकरिता आणलेल्या घोड्याला जबर धडक दिली. यात कारचालक प्रकाश शेटे रा. यवतमाळ यांच्या कारचे नुकसान झाले. तसेच दिनेश सुखदेवरा दहिवाडे रा. आर्वी यांच्या चार लाख रुपये किमतीच्या घोड्याच्या मागच्या दोन्ही पायासह कंबरेला जबर मार लागला. सुदैवाने वरात निघायची होती म्हणून मोठी दुर्घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून ट्रॅव्हल्स चालक श्रीकांत आघाडे रा. नांदगाव (खंडेश्वर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.
एसटीच्या संपामुळे ट्रॅव्हल्सची प्रवासी वाहतूक वाढली...- गेल्या तीन महिन्यापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा संप सुरू असल्याने बसेस आगारात उभ्या आहेत. याचाच फायदा घेत ट्रॅव्हल्स चालक प्रत्येक गावातून प्रवासी मिळविण्यासाठी धडपडत आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील गावामध्ये असलेल्या सर्व्हिस रोडनेही प्रवाशांची ने-आण करीत आहे. बरेच जण रस्त्याच्या मध्यभागी ट्रॅव्हल्स उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. त्यामुळेही अपघाताला सामोरे जावे लागत आहे.