वर्धा बाजार समितीची सभा : ‘त्या’ कामाला १० सदस्यांचा विरोध वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिची सोमवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बजाज चौक परिसरातील भाजी बाजाराच्या सौंदर्यीकरणाचा व त्याच्या विकासाचा मुद्दा येताच सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. भाजी बाजाराचे सौंदर्यीकरण व विकासाच्या मुद्यावर उपसभातीसह १० संचालकांनी विरोध नोंदविला. तर या कामाला सभापतीसह उर्वरीत आठ संचालकांनी होकार देत मतदान केले. केवळ बाजार समितीच्या सभापतीवर आणण्यात आलेला अविश्वास बारगळल्याने विकास कामांना विरोध होत असल्याचा आरोप यावेळी काही संचालकांकडून करण्यात आला. बाजार समितीच्या सभागृहात दुपारी १ वाजता ही सभा सुरू झाली. या सभेला १७ संचालक हजर होते. केवळ एकच संचालक गैरहजर होते. गत सभेत चर्चा झालेल्या विषयाची माहिती समितीचे सचीव समीर पेंडके यांनी सभागृहाला दिली. यावेळी बाजार समितीच्या अधिकारात येत असलेल्या वर्धा शहरातील बजाज चौकातील बाजाराच्या सौंदर्यीकरणाचा मुद्दा आला. हा मुद्दा पुढच्या सभेत घेण्याबाबत चर्चा सुरू असताना अडते व मापारी गटाचे संचालक विजय बंडेवार यांनी हा मुद्दा पुढच्या नाही तर आजच्या सभेत निकाली काढण्याची मागणी केली. शिवाय गत चार सभेपासून हा विषय सभेत असून तो पुढच्या सभेत नेण्याचाच प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याच मुद्यावर सुरू असलेल्या चर्चेत दुसरे संचालक पवन गोडे यांनी उडी घेत बंडेवार यांच्या सूरात सूर मिसळला. त्यांनीही हा मुद्दा आजच मार्गी काढण्याची मागणी सभापतींना केल्याने सभेत चांगलेच शाब्दिक युद्ध झाले. यावर उपसभापती पांडुरंग देशमुख, जगदीश म्हस्के व रमेश खंडागळे यांनी आमचा विरोध विकास कामांना नाही तर बाजार समितीच्या नव्या रचनेकरिता निवड करण्यात आलेल्या आर्किटेकला असल्याचा मुद्दा उचलत विरोध दर्शविल्याचे म्हणत बाजू मांडली. यावरून झालेल्या गदारोळात विषयाच्या बाजूने व विरोधात असलेल्या संचालकांचे मतदान घेण्याचे ठरले. यात विषयाच्या विरोधात १० सदस्यांनी मतदान केले. यात पांडुरंग देशमुख, रमेश खंडागळे, शरद देशमुख, कमलाकर शेंडे, जगदिश म्हस्के, सुरेशसिंह मेहर, वैशाली उमाटे, भूषण झाडे, दिनेश गायकवाड, शरद झोड यांचा समावेश आहे. तर सभापती श्याम कार्लेकर, विजय बंडेवार, पवन गोडे, मुकेश अळसापूरे, दत्ता महाजन, अपर्णा मेघे, प्रकाश पाटील, अरविंद भूसारी यांच्यासह समितीत तज्ज्ञ म्हणून उपस्थित असलेले अॅड. वैभव वैद्य व गंगाधर डाखोळे यांनी कामाला होणार देण्याच्या बाजूने मतदान केले. विषयाच्या विरोधात अधिक मतदान असल्याने सभेतून विषय बाद करण्यात आल्याने सभेत चांगलाच गोंधळ झाला. यानंतर विविध विषयावर चर्चा करण्यात आली.(प्रतिनिधी) आर्किटेक्टच्या नावाची बोर्डाच्या सभेतूनच झाली होती निवड ४बाजार समितीच्या विकासाची व तिच्या नव्या रूपाची मांडणी करण्याकरिता आर्किटेक्ट ओस्तवाल यांच्या नावावर समिती संचालकांच्या सभेत चर्चा करून निवड करण्यात आली होती. यावेळी सर्वच सदस्यांत एकमत झाल्याने त्या आर्किटेक्टचे नाव ठरविण्यात आले होते. आता सभापतींवर आलेला अविश्वास बारगळल्याने संचालकांकडून विकास कामांना विरोध होत असल्याचा आरोप संचालक बंडेवार यांनी केला. या कामाकरिता एकूण १० आर्किटेक्टच्या निविदा सादर झाल्या होत्या. विरोध नोंदविणाऱ्यांना जर या आर्किटेक्टच्या नावाचा विरोध असेल तर त्यांनी इतर निविदांचा विचार करून निवड करावी, असेही बंडेवार यावेळी म्हणाले. भाजी बाजाराच्या विषयावर चौथ्यांदा चर्चा ४भाजी बाजाराच्या विकासाच्या विषयावर सभेत चौथ्यांदा चर्चा होत आहे. यामुळे हा विषय मार्गी लावण्याची संचालकांची मागणी असल्याचे सभेत दिसून आले आहे. भाजी विक्रेत्यांची उपस्थिती ४सोमवारच्या सभेची व त्यात होणार असलेल्या चर्चेची माहिती भाजी बाजारातील विक्रेत्यांना मिळाल्याने त्यांचीही येथे उपस्थिती होती. त्यांनीही बाजारात झालेली चर्चा पाहून विकास कामे होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या बाजारात दररोज शहरातील नागरिक व शेतकरी येतात. यामुळे येथे विकास होण्याची गरज भाजी विक्रेते प्रकाश फुटाणे, रितेश सांबरे, गणेश चौधरी, आशु रंगेवार यांनी व्यक्त केली.
भाजी बाजाराच्या सौंदर्यीकरणावरून घमासान
By admin | Updated: October 11, 2016 02:21 IST