वर्धा : शहराचे सौंदर्यीकरण म्हटले की पुतळ्यांचे अवलोकन केले जाते. इतर व्यवस्थेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. शहरातील तीन चौकांबाबत नेमके हेच घडले आहे. रेल्वे स्थानक जवळ असलेला शास्त्री चौक, शिवाजी महाराज चौक आणि एका चित्रपट गृहाच्या नावाने ओळखला जाणारा आरती चौक येथील पुतळ्यांचा रखरखाव व्यवस्थित आहे; पण तेथे अन्य व्यवस्थेचा अभावच दिसून येतो. यामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाल्याचे पाहावयास मिळते. यामुळे पुतळे चांगले दिसत असले तरी चौक मात्र बरबटलेलेच दिसतात.शहरातील सर्वात मोठा पुतळा असलेला शिवाजी चौक महत्त्वाचा आहे. या चौकाने मुख्य रस्त्याचेच दोन तुकडे झाले आहेत. बजाज चौकातून पूढे शिवाजी चौकाकडे जाणारा मुख्य मार्गाचे विभाजन होते. यातील एक मार्ग आर्वी तर दुसरा नागपूरकडे जातो. या चौकात शिवाजी महाराजांचा मोठा अश्वारूढ पुतळा आहे. पुतळ्याची व्यवस्थित देखभाल केली जात असली तरी परिसरात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचे दिसते. रस्ता दुभाजकामध्ये मोठे अंतर ठेवण्यात आले आहे. यामुळे वाहने कशीही वळविली जातात. शिवाय पुतळ्याला वळसा देऊन वळण घेणे गरजेचे असताना पुतळ्याच्या मागील बाजूने असलेल्या रस्त्यानेच वाहनांची ये-जा होते. यामुळे अनेकदा अपघातांची शक्यता असते. शिवाय जड वाहनेही पुतळ्याच्या मागील रस्त्याचाच वापर करीत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. येथून पूढे जाणारा नागपूर मार्ग रुंद आहे तर आर्वीकडे जाणारा मार्ग अरुंद झाल्याचे चित्र आहे. या मार्गावर रस्ता दुभाजक व फुटपाथ तयार केला; पण ते अडचणीचेच ठरताना दिसते. यासाठी चौकांतील व्यवस्था राखणेच गरजेचे झाले आहे.
पुतळ्यांचे सौंदर्यीकरण; व्यवस्थेचा बोजवारा
By admin | Updated: July 19, 2015 02:15 IST