गौरव देशमुख वर्धा आजचे जीवन धकाधकीचे झाले आहे. या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आरोग्य सुदृढ ठेवणे कठीणच झाले आहे. याचा प्रत्यय जिल्हा सामान्य रुग्णालयात गत चार वर्षापूर्वी सुरू झालेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात झालेल्या तपासणीत आला आहे. यात प्रत्येक वर्षाला पाच हजार नागरिकांना मधुमेह असल्याचे समोर आले आहे. ही बाब चिंतेची असून याचे महत्त्वाचे कारण वाढता मानसिक तणाव असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात जिल्हा सामान्य रुग्णालयात आॅगस्ट २०११ पासून जानेवारी २०१५ पर्यंत ३० वर्षावरील ५ लाख ३८ हजार ६८९ नागरिकांनी तपासणी केली. यात २० हजार २५२ नागरिकांना त्याची लागण झाल्याचे समोर आले आहे. या आजारावर औषधोपचार असला तरी मधुमेह कायमस्वरुपी बरा होणारा आजार नाही. औषधोपचाराने केवळ यावर आळा बसविता येतो. मधुमेहाची लागण झालेल्यांना कोणताही औषधोपचार करताना पहिले या आजारावर ताबा मिळविणे गरजेचे आहे. शरीरात आवश्यकतेच्या तुनलेत रक्तात शर्कराचे प्रमाण वाढल्यास तो जीवघेणाही ठरणारा आहे. ही आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात सेवाग्राम व सावंगी (मेघे) येथे मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयासह जिल्ह्यात असलेल्या खासगी रुग्णालयात या आजारावर औषधोपचार करण्यात येतो. त्यांची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आकडेवारीपेक्षा अधिक असल्याची शंका वर्तविली जात आहे.
सावधान ! तुम्हालाही मधुमेह असू शकतो
By admin | Updated: February 26, 2015 01:22 IST