दृष्टी झाली अंधुक : नेत्रतज्ज्ञांकडे शेतकऱ्यांची उपचारासाठी धाववर्धा : खरीप हंगामातील कपाशी आणि सोयाबीन पिकांवर विविध रोगांचे आक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे कृषी विभागाकडून अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या; पण काही शेतकरी स्वत:च्या वा कृषी केंद्र संचालकांच्या मते औषधांची फवारणी करीत आहेत. परिणामी, काही फवारणी औषधी डोळ्यांसाठी घातक ठरत असल्याचे समोर आले आहे. फवारणी औषध डोळ्यात उडाल्याने अंधुक दिसत असल्याच्या तक्रारी घेऊन चार शेतकरी दवाखान्यात पोहोचल्याने ही बाब उघड झाली आहे. अनियमित पाऊस आणि दमट वातावरणामुळे सध्या सोयाबीन व कपाशीवर अनेक रोगांचे आक्रमण झाले आहे. हे रोग दूर करण्यासाठी कृषी विभाग विविध उपाययोजना सुचवित आहेत. यात घ्यावयाच्या काळजीबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. सध्या सोयाबीनवर पिवळा मोझॅक, उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी यासह अन्य रोगांचे आक्रमण दिसून येते. कपाशीवरही मिलीबग, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, चुरडा, मर रोग, फकडी, बोंडे खाणारी अळी आदी कीडरोग दिसून आले आहे. दोन्ही पिकांवर आलेल्या या रोगांपासून पिकांना वाचविण्यासाठी कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र सेलसूरा यांनी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. यात पिकांवर फवारणी करण्याचाच सल्ला देण्यात आला असून औषधींची माहितीही शेतकऱ्यांना दिली गेली. असे असले तरी जिल्ह्यात काही भागातील शेतकरी स्वत:च्या आणि कृषी केंद्र संचालकांच्या मनाप्रमाणे औषधी घेऊन फवारणी करीत आहेत. यातील बहुतांश औषधी मानवी शरीराला इजा पोहोचविणाऱ्या असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. असे असले तरी त्यांची धडाक्याने विक्री केली जात असल्याचेच दिसून येते. कपाशीवरील पांढरी माशी या कीडरोगाच्या नियोजनाकरिता काही भागात वापरल्या गेलेल्या औषधांचा डोळ्यांवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत चार शेतकऱ्यांनी डोळ्यांचा दवाखाना गाठला आहे. डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली असता सदर औषध अत्यंत घातक असल्याचे सांगण्यात आले आहे. कपाशीवर फवारण्यात आलेले हे औषध डोळ्यामध्ये उडाल्यामुळे त्या शेतकऱ्यांची दृष्टी अंधुक झाली आहे. तीन दिवसात चार शेतकऱ्यांनी वर्धेत नेज्ञतज्ज्ञांकडे धाव घेऊन उपचार करुन घेतले आहे. सध्या कपाशीचे पीक जोमात असून ते उंच वाढले आहे. यामुळे फवारणी करताना चष्मा लावता येत नाही. परिणामी, फवारणीचे औषध डोळ्यांसह अंगावरही उडते. याचा डोळे, शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यताही नेत्रतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कुणाच्या मताप्रमाणे फवारणी औषध खरेदी करण्यापेक्षा कृषी विभागाने सुचविलेल्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. शिवाय शेतातील पिकांवर फवारणी करताना विशेष काळजी घेणेही गरजेचे झाले आहे. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि वैद्यकीय व्यावसायिकांनीही शेतकऱ्यांना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)पीडित शेतकरी म्हणतो, ‘पोलो’ नामक औषधाचा केला वापरकपाशीवर सध्या पांढरी माशी हा कीडरोग आढळून येत आहे. या रोगाच्या नियंत्रणाकरिता शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले होते; पण सेवाग्राम परिसरातील शेतकऱ्यांनी दुसऱ्याच औषधाचा वापर केल्याचे समोर आले आहे. नागापूर येथील शेतकरी राजू नारायण भोयर या शेतकऱ्याने १५ एकरामध्ये असलेल्या कपाशी, सोयाबीन पिकांवर फवारणी केली. यासाठी ‘पोलो’ नामक औषध वापरले. त्याचे फवारे डोळ्यात गेल्याने दृष्टी अंधुक झाल्याचेही राजू भोयर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पावडर स्वरूपात असलेले हे औषध पाण्यात मिसळून फवारावे लागते. यासाठी सदर शेतकऱ्याने एका कि.लो. मागे तब्बल ४ हजार रुपये खर्ची घातले. या औषधाची पिकांवर फवारणी करण्यात आली. दरम्यान, ते डोळ्यांमध्ये उडाल्याने राजू भोयर यांना दोन्ही डोळ्यांनी अंधुक दिसू लागले. या औषधाचा परिणाम सुमारे आठ दिवस जाणवत असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सावधान! फवारणी औषध ठरतेय डोळ्यांना घातक
By admin | Updated: October 1, 2015 02:46 IST