पोथरा धरणाचे दोन्ही कालवे बुजले : पाणी असूनही सिंचनाची बोंब; शेतकऱ्यांचे नुकसान भास्कर कलोडे ल्ल हिंगणघाटउपविभागातील पोथरा धरणाचा डावा व उजवा कालवा ठिकठिकाणी बुजला आहे. कालव्यात धरणाचे पाणी दिसत असले तरी कमी विसर्गामुळे ते शेतकऱ्यांच्या शेतात पोहचत नाही. पर्यायाने गाव सीमेत धरणाचे पाणी पोहचून सुद्धा शेती सिंचनाला उपयोग होत नाही. वर्षानुवर्षांच्या या समस्येकडे शासनाने लक्ष देवून या कालव्यांची डागडुजी करून शेवटच्या टोकापर्यंत सिंचनाची व्यवस्था करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.समुद्रपूर तालुक्यातील पोथरा नदीवर १९७८ मध्ये निर्मित पोथरा धरणाचा नऊ कि़मी.चा डावा कालवा पवनगाव नंतर वरोरा तालुक्यात जातो. ३५ कि़मी. चा उजवा कालवा लाडकी पर्यंत व पुढे १० कि़मी.ची वितरिका चिचघाट पारडीपर्यंत गेली आहे. या कालव्याची हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यातील सिंचन क्षमता कागदोपत्री ५ हजार २०० हेक्टर दर्शविण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र निम्म्या क्षेत्रातही ओलीत पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे वास्तव आहे.दोन्ही कालवे ठिकठिकाणी गाळाने बुजले असून त्यात झुडपे वाढली आहेत. अनेक ठिकाणी कालव्याला भेगा गेल्या आहे. पूल कलवर्ट खचले आहेत. हिच अवस्था वितरिकांची व पाटचऱ्यांची झाली आहे. दरवर्षी या कालवे व पाटसऱ्यांचे दुरूस्तीसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी दिला जातो. तो खर्च झाल्याचे कागदोपत्री दिसत आहे. या कालव्याची व पाटसऱ्यांची मिळालेल्या निधीच्या प्रमाणात दुरूस्ती होत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी ५-१० वर्षांची बाभळीची ऐटीत वाढणारी झाडे दिसत आहेत. कालव्याच्या दुरूस्तीकरिता ८.९३ कोेटींचा प्रस्ताव ४पोथरा धरणाचा डावा व उजवा कालवा दुरूस्तीसाठी या विभागाने ८ कोटी ९३ लाखाचे इस्टीमेट प्रस्तावित केले असून मंजुरीसाठी शासनस्तरावर प्रलंबित आहे. त्याच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे.क्षमतेपेक्षा सिंचन अल्पच ४तालुक्यात पोथरा धरणाचे पाणी लाडकी बुरकोनीपर्यंत पोहचले आहे. असे असले तरी बुरकोनीत मोटारपंपाची सोय असलेल्या चार पाच शेतकऱ्यांनीच या पाण्याचा सिंचनासाठी लाभ घेतल्याचे म्हणणे आहे. बुरकोनीपर्यंत धरणाचे पाणी पोहचत असले तरी पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग होत नाही. पूर्ण क्षमतेने विसर्ग झाल्यास मुख्य कालवा ओव्हर फ्लो होवून फुटण्याची भीती असल्याने पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्या जात नसल्याची माहिती आहे. पर्यायाने कालव्यात पाणी दिसत असले तरी पाटचऱ्यामध्ये ते वाहत नाही, अशी अवस्था आहे. ४ही अवस्था बदलावी म्हणून शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिली असली तरी समस्या मात्र कायम आहे. पूल कलवर्टच्या लिकेजसाठी गाऊटींगची आवश्यकता दर्शवून केवळ प्लास्टरने दुरूस्ती करण्यात येत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. एकंदरीत मुख्य कालवा व पाटचऱ्या दुरूस्तीचे काम योग्यप्रकारे करून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी शासन कर्मचारी अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत.पोथरा उजवा मुख्य कालवा व पाटचऱ्या ठिकठिकाणी गाळाने बुजल्या असल्याने व झुडपी वाढल्याने पूल कलवर्टला भेगा पडल्याने पाण्याचा अपव्यय होतो. पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग होत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतात धरणाचे पाणी पोहचत नाही.- शंकर पानवटकर, शाखा अभियंता, उपविभाग हिंगणघाट.
कालवा बुजल्याने शेतात पाणी पोहोचण्यास अडथळे
By admin | Updated: December 22, 2015 03:17 IST