कर भरण्याबाबत उदासीनता : ६७ कार्यालयातून चालतो जिल्ह्याचा कारभाररूपेश खैरी - वर्धाजिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरात एकूण ६७ कार्यालयातून शासकीय काम सुरू आहे. ही कार्यालये शहराच्या हद्दीत येत असल्याने त्यांच्यावर पालिकेच्यावतीने मालमत्ता कर आकारण्यात येत आहे. हा कर भरण्यास मात्र ही कार्यालये उदासिन असल्याचे दिसून आले आहे. शहरात असलेल्या एकूण कार्यालयांवर करापोटी पालिकेचे ३० लाख रुपये थकले आहे. कराची रक्कम देण्याकरिता पालिकेच्यावतीने या कार्यालयांना नोटीसी बजावण्यात आल्या असल्या तरी त्यांच्याकडून याला कुठलाही प्रतिसाद देण्यात येत नसल्याची माहिती आहे. शहरात फेब्रुवारी महिन्यापासून कर वसुलीची मोहीम सुरू करण्यात येत आहे. कर वसुलीतून येणाऱ्या रकमेवर शहरात विकास कामे करण्यात येतात. येथे मात्र कर भरण्यात शासकीय यंत्रणाच उदासिन असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या विकासाकरिता व नागरिकांना सुविधा पुरविण्याकरिता काम करणाऱ्या पालिकेला जिल्ह्याचे काम सांभाळणाऱ्या कार्यालयांकडून मिळत नसलेल्या प्रतिसादामुळे अनेक विकास कामे खोळंबल्याचे चित्र आहे. सर्वच कार्यालयांकडे थकबाकी आहे असे नाही. जिल्हाधिकारी व पोलीस विभागाकडून मात्र नियमित कर भरल्या जातो. ‘सुंदर शहर स्वच्छ शहर’ देण्याकरिता पालिकेकडे आवश्यक निधी नसल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. कराच्या थकबाकीपोटी नागरिकांवर पालिकेच्यावतीने जप्तीची कारवाई होते; मग या कार्यालयांवर तशी कारवाई का होत नाही असा सवाल शहरातील नागरिकांकडून होत आहे.
शासकीय कार्यालयांवर पालिकेची थकबाकी "३० लाख
By admin | Updated: January 18, 2015 23:14 IST