सेलू : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सर्वांनाच माहिती आहे. एकेकाळी शेतकरी व कर्मचार्यांची विश्वासाची असलेली ही जिल्हा बँक पूर्णत: डबघाईस आली आहे. या बँकेच्या सेलू शाखेत आजच्या घडीला असेलेली शिल्लक अवाक् करणारी आहे. या बँकेच्या तिजोरीमध्ये तीन दिवस केवळ १ रुपया ९३ पैसे एवढी रक्कम शिल्लक असल्याचे समोर आले आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस आली आहे. बँकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. ११ मे रोजी एक खातेदार आत्यंतिक आर्थिक अडचणीमुळे बँकेत ५00 रुपयांचा विड्राल करायला गेला. तेथील कर्मचार्यांनी त्याच्या अडचणीत मदत करू शकत नसल्याबाबत खेद व्यक्त केला. एवढेच नव्हे तर बँकेच्या तिजोरीत केवळ १ रुपया ९३ पैसे एवढी रक्कम शिल्लक असल्याचे सांगितले. हे ऐकताच खातेदाराला भोवळच आली. शेतकरी, कर्मचार्यांनी कष्टाचे पैसे विश्वासाने येथे ठेवले. अडचणीच्या वेळी कधीही रक्कम काढू शकतो, ही भोळी आशा आज सर्व खातेदारांच्या जीवावर उठली आहे. बँकेचे कर्जदार कर्जफेड करीत नसल्याने पैसा येणार कुठूण, असा प्रतिप्रश्न बँकेचे कर्मचारी खातेदाराला विचारताना दिसतात.कर्जदाराकडून वसूल झालेल्या रकमेतून अडलेल्या खातेदाराचे विड्राल देणे अपेक्षित आहे; पण बँक या वसुलीतून कर्मचार्यांचे वेतन नियमित करीत आहे. केवळ एक महिन्याचे वेतन तेवढे थकित आहे. बँक डबघाईस आली आणि खातेदार अडले. त्यांना गरजेच्या वेळी पैसा नाही. कर्मचार्यांना मात्र पगार मिळतो. बँक बुडाली तरी खातेदार मरतील. खातेदराचे बँकेत पैसे असताना आजारपण, लग्नकार्य, मुलांचे शिक्षण, शेती या कामी येत नाही. पैसा असून घरात किराणा वेळेवर येत नाही. कोरडी, ओली भाकर खाऊन तो चिंताग्रस्त असून त्याला झोप लागत नाही. बँकेमुळे खातेदारच अर्धमेला झाल्याचे दिसते.सेलू शाखेप्रमाणेच इतर शाखांची स्थिती असून तेथेही हेच वास्तव आहे. बँकेत आता संचालक मंडळ नाही. प्रशासकाकडे बँकेचा कारभार आहे. बँकेत आता शेतकर्यांचा कुणीच वाली उरला नाही. आता कुणाच्या तोंडाकडे पाहावे, असा प्रश्न खातेदार, शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. (तालुका प्रतिनिधी)
सेलूच्या मध्यवर्ती सहकारी बँकेची शिल्लक१ रुपया ९३ पैसे
By admin | Updated: May 15, 2014 01:48 IST