नितीन देशमुख यांचा सवाल : वर्धा कला महोत्सवातील शेतकरी कवी संमेलनवर्धा : ‘गेले जमाने आंबे, चिचाचे, बोरीच्यास खाली बोरं येचाचे’, असे गावापासून दुरावल्याची वेदना मांडणारे तर कधी ‘जरी वाटणी ही भिंतींची, हृदय वाढले माझे, त्या बापाला दु:ख विचारा, पटवाऱ्याला नाही’ अशी गावगाड्यातील व्यथा व्यक्त करीत उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेणारे शेतकरी कवी संमेलन वर्धा कला महोत्सवाचे वैचारिक, सांस्कृतिक मूल्य वृद्धींगत करून गेले. स्थानिक लोक महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर कला महोत्सव समिती आणि दत्ता मेघे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.‘तिफन’कार कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेत आयोजित कवी संमेलनात गझलकार नितीन देशमुख अमरावती, आबेद शेख यवतमाळ, विशाल इंगोले बुलढाणा या प्रतिभावंत वैदर्भीय युवा कवींनी एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर केल्या. गीतकार, अभिनेते किशोर बळी अकोला यांच्या विनोदाची झालर असलेल्या आणि तरीही अंतर्मुख करणाऱ्या निवेदनालाही वर्धेकर रसिकांनी भरभरून दाद दिली.मातीचा सुगंध देणाऱ्या या काव्यमैफलीची सुरूवात आबेद शेख या खेड्यातून आलेल्या युवाकवीच्या सशक्त शब्दांनी झाली. ‘समजू नको ढगा, हे साधेसुधे बियाणे, मी पेरतो पिलांच्या, चोचीमधील दाणे’, उघडा पडेल सारा संसार हा अशाने, मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने’ या शब्दातून त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. आपला स्वानुभव मांडताना तो म्हणतोय, ‘जग चंद्रावर जावो वा मंगळावर, याच्याशी नाही तिला घेणं देणं, माझ्या मायचं एकच ध्येय, या धुऱ्याची पात त्या धुऱ्याला नेणं...’ शेतकऱ्यांच्या परिस्थितीला कारणीभूत सत्तेवरही आबेद यांनी, ‘खंजीर काय असतो, तू पाहिलेच कोठे, जा संसदेत भरले दरबार खंजिरांचे, ओठात एक असते, पोटात एक असते, सारेच लोकनेते अवतार खंजिरांचे...’ अशा शब्दांतून टीकास्त्र सोडले.डॉ. विशाल इंगोले यांनी सादर केलेल्या ‘हाडाच्या शेतकऱ्याने काही बोलायचे नसते’ या कवितेने उपस्थितांना जिंकून घेतले. ‘पायाने माती अन् डोळ्याने शेती न पाहिलेल्या डोक्यातून उगवते पुस्तकांचे अन् योजनांचे पीक’ हे या देशातील कृषिविषयक धोरणांचे वास्तवही डॉ. इंगोले यांनी मांडले. ‘पेनातून यावे माझ्या पोटातले रक्त, कागदाच्या देहावर राहो बळीराजा फक्त’, असे आत्मभानही त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केले. कवी संमेलनात खरी रंगत आणली ती नितीन देशमुख यांच्या सुरेल आवाजातील गीतगझलांनी. ‘गेले जमाने सांगणारे’ शेतकऱ्यांचे दु:ख शेतकऱ्यालाच कळू शकते, हे ही आपल्या कवितेतून सांगून जातात आणि लढण्याची हिंमतही देतात. जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याला नाही, जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही, वेल म्हणाली कळीस बाई, इतुके असू दे ध्यानी, लाख दिवाणे फुलणाऱ्याला, गळणाऱ्याला नाही... हेही हा युवाकवी सांगून जातो. कापूस हिरवा, कापूस भगवा, निळा, पांढरा झाला, पण सगळ्या झेंड्यांचा कपडा शेतामधून आला, या जगताचे धर्म जन्मले शेतामधून माझ्या, इतके कळले ज्याला मित्रा, कापूस कळला त्याला, अशा दमदार गझलेतून नितीन देशमुख कापसाचे महात्म्य सांगून जातात. किशोर बळी ‘हे जीवन एक लढाई, अशी हिंमत हारायची नाही’ हे गीत सादर करून शेतकऱ्यांना दिलासा देतात. ‘शाही लोकांची ही लोकशाही, त्यांच्या छातीत काळीज नाही, एकजुटीने सत्तेशी झगड, नाक दाबून तोंड तिचे उघड, घात आजवर ज्यांनी तुझा केला, टाक जाळून त्या व्यवस्थेला’ असे क्रांतिकारी आवाहनही बळी करून जातात.कविवर्य विठ्ठल वाघ यांच्या दमदार आवाजाने, चपखल शब्दांनी आणि परखड वैचारिक भूमिकेने या कवी संमेलनावर कळस चढविला. यावेळी त्यांनी शेतीचे आणि शेतीवर विसंबून असणाऱ्या माणसांचे अडते कुठे हे सांगताना ‘कोरडे हे शेत आता ओलित झाले पाहिजे, मुक्या जीवाचे दु:ख हे बोलीत आले पाहिजे’ ही कविता सादर केली. पीक कोणतेही असो, सरकार कुणाचेही असो, जोपर्यंत रास्त भाव मिळणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, हेही विठ्ठल वाघ सांगून गेले. मंचावर संजय इंगळे तिगावकर, डॉ. उषा फाले, श्याम शंभरकर, प्रदीप दाते, संदीप चिचाटे आदी उपस्थित होते. संचालन डॉ. किरण नागतोडे यांनी केले तर आभार नरेंद्र लोणकर यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)
त्या बापाला दु:ख विचारा...
By admin | Updated: December 27, 2015 02:33 IST