भाजपाचे आंदोलन : कार प्रकल्पातील मोबदला आर्वी : कारंजा येथील कार नदी प्रकल्पात सुसुंद्रा आणि माणिकवाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने २० वर्षांपूर्वी हस्तगत केल्या; परंतु त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. शासकीय धान्य गोदामात आर्वीत हमाली कामाचे दर हे हिंगणघाट व वर्धा येथील गोदामापेक्षा अत्यल्प आहे. त्यामुळे आर्वी येथील शासकीय गोदामात हमाली काम करणाऱ्यांना हिंगणघाट व वर्धा गोदामाचे भाव लागू करावे, या मागण्यांकरिता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप यांनी गुरुवारी ‘साहेब बसले उरावर’ आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.कारंजा येथे २० वर्षांपूर्वी कार नदी प्रकल्प झाला, कार नदी प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत केल्या. सुसुंद्रा व मौजा माणिकवाडा येथील शेतकऱ्यांना २० वर्षे लोटूनसुद्धा जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. या मागणीकरिता शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. प्रत्येक आंदोलनाच्यावेळी सदर प्रकरण एक पायरी समोर जात होते. त्यानंतर मात्र सर्व काम ठप्प होत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्याकरिता आज भाजपा युवा मोर्चाच्यावतीने ‘साहेब बसले उरावर’ हे अभिनव आंदोलन केले. संबंधित अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक मुखवटे लावून त्यांना खांद्यावर बसवून निदर्शने करीत उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दोन्ही मागण्या लवकरात लवकर निकाली न निघाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात भाजपा युवा मोर्चाचे सुधीर जाचक, अरसलान खान, अमित शिंगाने, पुनीत छांगाणी, रामू राठी, दीपक जैसिंगपूरे, मेहबुबभाई, राहुल फुले, बंटी चांदुरकर, स्वप्नील कठाळे, प्रवीण पवार, दिनेश लायचा, विक्रम भगत, चिंटू फुनसे, सुजू कुरील, सागर केचे, शेख वाजिद, रवी गाडगे, निखील भर्रे, मंगेश शिरपूरकर, शब्बीर अहमद, सुमित शिंगाने, गुलशन बरारा, अमर मल्होत्रा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होते.(तालुका/शहर प्रतिनिधी)हमाली दरातील तफावत आर्वी येथील शासकीय गोदामात हमाली काम करणाऱ्यांना हिंगणघाट व वर्धा येथील गोदामात हमाली काम करणाऱ्यांच्या तुलनेत फार कमी मोबदला दिला जातो. त्यामुळे आर्वी येथील शासकीय गोदामात हमाली काम करणाऱ्यांना हिंगणघाट व वर्धा गोदामात हमाली काम करणाऱ्यांईतकाच मोबदला देण्यात यावा यासाठी हे आंदोलन होते.
आर्वीत ‘साहेब बसले उरावर’
By admin | Updated: March 4, 2016 02:07 IST