रामदास तडस : विदर्भ प्रदेश विकास परिषदेचा मेळावावर्धा : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर स्वामीनाथन आयोग लागू करण्याशिवाय पर्याय नाही. विदर्भ विकासासाठी विविध स्तरावर काम करणाऱ्या सर्व संघटनांनी एकत्रित लढा उभारण्याची गरज खा. रामदास तडस यांनी व्यक्त केली. सावंगी (मेघे) येथील सभागृहात रविवारी आयोजित विप्रवि परिषदेच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, यासाठी विदर्भातील सर्व लोकप्रतिनिधींनी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मेघे यांनी या मेळाव्यात केले. यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, तुमसर येथील आ. चरण वाघमारे, जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे, ज्येष्ठ कृषी अभ्यासक प्रा. शरद पाटील, जनमंचचे संस्थापक अॅड. अनिल किलोर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, गिरीधर राठी, विप्रवि परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे यांची उपस्थिती होती. विदर्भातील अन्यायाचे खापर इतरांच्या माथी फोडण्यापेक्षा जनप्रतिनिधींना जाब विचारायची सवय स्वत:ला लावून घ्या विदर्भाचा विकास झाला नसेल तर त्याला आम्हीच कारणीभूत आहोत, अशा स्पष्ट शब्दात प्रा. शरद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करतानाच त्यांनी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी गैरराजकीय संघटनांनी एकत्र येवून जनसामान्यांचा दबाव गट निर्माण करावा, असे आवाहनही प्रा. पाटील यांनी व्यक्त केली. जनमंचचे अॅड. अनिल किलोर यांनी, स्वातंत्र विदर्भराज्य व्हावे, ही इथल्या जनतेचीच मागणी आहे, हे यापूर्वी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, असे मत मांडले. विदर्भाच्या नैसर्गिक समृध्दीबाबत सांगतानाच सरकारी धोरणांनी विदर्भवासीयांची कशी गळचेपी केली, याचीही साधार मांडणीही त्यांनी केली. आज केंद्रात भाजपाचे सरकार बहुमतात असून या सरकारने निर्णय घेतल्यास स्वातंत्र विदर्भराज्य निर्मितीला कोणीही थांबवू शकत नाही. केंद्र सरकारने आता आपली नैतिक जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली आहे, असेही अॅड. किलोर म्हणाले. या मेळाव्यात आ. पंकज भोयर, आ. कुणावार, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे, राजेश बकाणे यांनीही मार्गदर्शन केले. विदर्भ प्रदेशाकरिता दशसूत्री कार्यक्रम दत्ता मेघे : विदर्भ विकास परिषदेचा मेळावावर्धा : मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात दत्ता मेघे यांनी विप्रवि परिषदेद्वारे सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या दशसूत्री कार्यक्रमाबाबतही माहिती दिली. येत्या वर्षभरात विदर्भाची बाजू मांडणाऱ्या व नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या पाच हजार प्रशिक्षित सक्रिय कार्यकर्त्यांचे जाळे संपूर्ण विदर्भात निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही मेघे यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजू मिश्रा यांनी केले. मेळाव्याची भूमिका विलास कांबळे यांनी मांडली. मंचावर जि.प. सदस्य राणा रणनवरे, अरुण उरकांदे, मंदा चौधरी, सुनीता ढवळे, नितीन देशमुख, दिलीप अग्रवाल, प्रदीप ठाकूर, जयंत गोमासे, अशोक कलोडे, साधना सराफ, महेश पुरोहित, बबलू गौतम, विजय घाडगे, मेहमूद अंसारी, नरेंद्र पांडे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमल कुलधरिया, ं अभ्युदय मेघे, संतोष ठाकूर, प्रशांत बुरले, हरीश दिंकोडवार, दादा बांगडे, शाबीर कुरेशी, कापसे, दोड आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाभरातून परिषदेचे कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)वेगळ्या विदर्भाकरिता पाच हजार प्रशिक्षित कार्यकर्ते वेगळ्या विदर्भाकरिता नागरिकांत चेतना निर्माण करण्याकरिता व विदर्भाची बाजू मांडणाऱ्या नागरिकांना मदतीचा हात देण्याकरिता पाच हजार प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे जाळे संपूर्ण विदर्भात निर्माण करण्याची यावेळी चर्चा करण्यात आली. शिवाय वेगळ्या विदर्भाकरिता राज्यकर्त्यांना जाब विचारण्याची भूमिका ठरविण्यात आली असून सर्वांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता स्वामीनाथन आयोग लागू करा
By admin | Updated: February 29, 2016 01:41 IST