लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एक व्यक्ती समाजात वावरते, काम करते पण, ती इतरांना दिसत नाही. ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात हा प्रसंग अनेकांनी पाहिला. असाच काहीसा प्रकार देवळीतील तालुका पशुचिकित्सालयात अनुभवास मिळत आहे. येथील सहायक आयुक्त हे कार्यालयात येत असल्याचे अधिनस्थ कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. मात्र, या अधिकाऱ्याला एकाही पशुपालकाने किंवा देवळीकरांनी पाहिलेले नाही. ते कोण, त्यांचे नाव काय? हेदेखील माहिती नाही. पण, लोकमतने ‘दवाखाने उघडे; पण उपायुक्त बेपत्ता’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच अनेकांनी तोंडात बोटे घातली आहेत.कोरोना संकटकाळात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले. तरीही देवळीच्या तालुका पशुचिकित्सालयातील सहायक आयुक्त डॉ. सुहास अलोणे व कारंजा येथील सहायक आयुक्त डॉ. मोहन खंडारे हे मुख्यालयी राहात नसल्याचे पुढे आले आहे. डॉ. अलोणे हे यवतमाळातील रहिवासी असून त्यांनी देवळीतील कार्यालयात आपल्या नावाची पाटीही लावली नाही. त्यामुळे येथे सहायक आयुक्त आहे, हेच देवळीकरांना माहिती नाही. सुमारे अडीच वर्षांपासून ते यवतमाळातून कार्यालयात कधी येतात याची माहिती नाही. त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली नसल्याचेही सांगण्यात आले आहे. सोबतच कारंजा येथील डॉ. खंडारे हेसुद्धा लॉकडाऊनच्या कालावधीत मोजक्याच दिवशी उपस्थित होते. विशेषत: गेल्या महिनाभरापासून ते वैद्यकीय रजेवर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी ज्यांच्याकडे भाडे तत्त्वार खोली घेतली, त्यांच्याकडेही ते दीड महिन्यापासून गेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ते नेमके किती दिवस मुख्यालयी होते, हा संशोधनाचा विषय आहे. लाखो रुपयांचे वेतन घेणारे अधिकारी मु्ख्यालयी व कार्यालयात उपस्थित राहात नसतानाही त्यांना वेतन दिले जात असेल तर वरिष्ठ अधिकारीही याला तेवढेच जबाबदार आहेत.जिल्हा उपायुक्तांचा ‘नो रिस्पॉन्स’देवळी व कारंजा (घा.) येथील सहायक उपायुक्तांबाबत माहिती घेण्याकरिता पशुसंवधन विभागाचे जिल्ह्यातील जबाबदार अधिकारी म्हणून जिल्हा उपायुक्त डॉ. राजीव भोजने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. डॉ. भोजनेंची कार्यप्रणाली जिल्ह्यात ‘सह्याजीराव’ अशीच राहिली असल्याची पशुपालकांतून ओरड होत आहे.
...आणि सहायक आयुक्त झाले ‘मिस्टर इंडिया’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST
कोरोना संकटकाळात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले. तरीही देवळीच्या तालुका पशुचिकित्सालयातील सहायक आयुक्त डॉ. सुहास अलोणे व कारंजा येथील सहायक आयुक्त डॉ. मोहन खंडारे हे मुख्यालयी राहात नसल्याचे पुढे आले आहे. डॉ. अलोणे हे यवतमाळातील रहिवासी असून त्यांनी देवळीतील कार्यालयात आपल्या नावाची पाटीही लावली नाही.
...आणि सहायक आयुक्त झाले ‘मिस्टर इंडिया’
ठळक मुद्देपशुचिकित्सालयातील भोंगळ कारभार : देवळीकर म्हणतात, आम्ही त्यांना कधी कार्यालयात पाहिलेच नाही!