प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : बनावट तृतीयपंथी, अवैध वेंडर्सचा हैदोसवर्धा : देशात सर्वात मोठे दळणवळणाचे जाळे असलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये सध्या प्रवाशांत असुरक्षिततेची भावना आहे. धावत्या रेल्वे गाडीत अवैध वेंडर्स, खाद्यपदार्थ विक्रेते, तृतीयपंथी आणि भिक्षेकरूंचा वावर वाढला आहे. पैसे न दिल्यास रेल्वे गाड्यांमध्ये फिरणारे बनावट तृतीयपंथी प्रसंगी प्रवाशांना मारहाण करतात. रेल्वे गाड्यांतील ही बाब नित्याची असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आली आहे; पण अलिकडे नागपूर ते अकोला दरम्यान रेल्वे गाड्यांत प्रवास ‘नको रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे असो वा पॅसेंजर गाड्या सर्वांमध्ये प्रवासी असुरक्षित आहे. रेल्वे गाड्यांत तृतीयपंथी वा अवैध वेंडर्स रेल्वे सुरक्षाबल, पोलिसांच्या मान्यतेशिवाय चालू शकत नाही. यासाठी तृतीयपंथी वा अवैध वेंडर्सकडून रेल्वे पोलिसांचे हप्ते ठरल्याचा आरोप वारंवार होतो. बडनेरा, अमरावती, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, वर्धा, पुलगाव, चांदूर (रेल्वे), धामणगाव आदी रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ कंत्राटदारांना अतिरिक्त वेंडर्सना व्यवसाय करण्याकरिता महिन्याकाठी रेल्वे सुरक्षाबल व रेल्वे पोलिसांना मोठी रक्कम पुरवावी लागते. खिसेकापू तासाप्रमाणे रेल्वे पोलिसांना पैसे मोजत असल्याची माहिती आहे. बडनेरा स्थानकावर खाद्यपदार्थ कंत्राटदारांकडून मान्यतेपेक्षा अधिक वेंडर्सना रेल्वे सुरक्षाबलाकडून परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. फलाटावर गाडी थांबली की, अवैध वेंडर्सचा बाजार दिसतो; पण धावत्या गाड्यांमध्ये बनावट तृतीयपंथियांकडून होणारी लूट कधी थांबणार, हा प्रश्नच आहे. तृतीयपंथियांच्या टोळीने रेल्वेत प्रवेश केला की, ते मर्जीनुसार पैसे उकळतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तृतीयपंथी टोळक्याने प्रवेश करतात. यासाठी रेल्वे स्थानकाच्या सीमा ठरल्या आहे. एका सीमेतच तृतीयपंथी वा अवैध वेंडर्सना व्यवसायाची रेल्वे सुरक्षा बलाकडून परवानगी दिली असली तरी चित्र वेगळेच आहे. हल्ली वर्धा, सेवाग्राम रेल्वे स्थानकावर हा प्रकार दिसत नसला तरी पुलगाव ते बडनेरा व सेवाग्राम ते समोर नागपूरपर्यंत तृतीयपंथी व अवैध वेंडर्सचा ससेमीरा असतोच. रेल्वे गाड्यांमध्ये घडणाऱ्या या प्रकारांवर आळा घालण्याकरिता रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी तसेच रेल्वे प्रशासनाने योग्य कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Updated: November 2, 2016 00:42 IST