समुद्रपूर : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत म्हणून मिळालेली रक्कम शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या पीक कर्जात कपात केली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एक दिवसाच्या आत कपात केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी तालुक्यातील निंभा येथील भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला मंगळवारी केली. याकडे दुर्लक्ष झाल्यास बँकेला कुलूप ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यंदा आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शाखा व्यवस्थापकांशी चर्चा करून सदर रक्कमेतून पीक कर्जात कपात करून नये अशी विनंती केली होती. परंतु बँक प्रशासनाकडून मदत म्हणून मिळालेल्या रक्कमेपैकी निम्मी रक्कम कपात करण्यात येत आहे. यामध्ये सरसकट सर्व शेतकऱ्यांची रक्कम कपात न करता काही लोकांना यातून सूट देण्यात असल्याचा आरोप आहे. इतर कोणत्याही बँकेने अशाप्रकारची सुलतानी कारवाई केली नाही. यामुळे एक दिवसाच्या आत कपात केलेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात यावी. अन्यथा बँकेला कुलूप ठोकून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा बँक प्रशासनास देण्यात आला. निवेदन देतेवेळी माणिक नक्षिणे, आनंद राऊत, रामराव भिले, अभिमान मांडवकर, विनोद तामगाडगे, मनोहर भिसे , जगदीश भिसे, भास्कर गणवीर, प्रमोद जामूनकर, राजकुमार जांभुळे, प्रभाकर धारणे, गजानन महल्ले, अशोक महल्ले, विठ्ठल हुलके, पुरूषोत्तम नन्नावरे, सुरेश नन्नावरे, संतोष नारनवरे आदी शेतकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
मदतीची रक्कम पीक कर्जात कापली
By admin | Updated: March 18, 2015 01:54 IST