देवळी : नगर पालिकेच्या २२ स्थायी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून जी.पी.एफ.ची रक्कम कपात करण्यात आली, परंतु ती कर्मचाऱ्यांच्या जी.पी.एफ. खात्यात जमाच करण्यात आली नसल्याची बाब उघड झाली आहे. ही रक्कम आपल्या खात्यात जमा करावी, अशी मागणी एका पत्रातून न.प. मुख्याधिकारी मेघना वासनकर यांच्याकडे केली आहे.या पत्राची एक प्रत खा. रामदास तडस आणि नगराध्यक्ष शोभा तडस यांनाही दिले आहे. पत्रानुसार, दरम्यान महिन्याला वेतनातून जी.पी.एफ.ची रक्कम कपात करण्यात येते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या जी.पी.एफ. खात्यात जमा केली जाते. परंतु मार्च ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत कपात केलेली रक्कम खात्यात जमाच केली नाही. यामुळे सदर रकमेवर मिळणाऱ्या व्याजाचे नुकसान होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. याबाबत मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.(प्रतिनिधी)
तब्बल आठ महिन्यांची रक्कम जीपीएफ खात्यात जमा नाही
By admin | Updated: December 18, 2014 22:59 IST