वर्धा : घरगुती गॅस सिलिंडरची सबसीडी बँक खात्यात जमा करताना होत असलेले घोळ अद्यापही कायम आहे. अनेक गॅसधारकांच्या सिलिंडरची सबसीडी त्यांच्या जुन्याच खात्यात जमा होत आहे. यामुळे अनेक ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. याकडे संबंधीत विभागाने लक्ष देत त्यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.सिलिंडर घरी आल्यानंतर ग्राहकाला त्याची पूर्ण रक्कम द्यावी लागते. यात काही काळानंतर शासनाकडून अनुदानाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा होते. ही योजना अस्तित्त्वात आली त्या काळापासूनच त्यात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. कधी एका ग्राहकाचे अनुदान दुसऱ्याच्या खात्यात तर दुसऱ्याचे अनुदान तिसऱ्याच्या बँक खात्यात जमा होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या अनुदानाची रक्कम मिळत नाही. हा घोळ दूर करण्याची मागणी या नागरिकांकडून होत आहे. येथील काही महिलांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कॉलेजच्या काळात शिष्यवृत्ती जमा होत असलेल्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होत आहे. गत कित्येक वर्षांपासून त्यांच्या या बँक खात्याचे व्यवहार बंद असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. शिवाय शासनाचे आदेश असताना त्यांच्याकडून संबंधीत वितरकाकडे आधार कार्ड व व्यवहार सुरू असलेल्या बँक खात्याच्या पासबुकाची झेरॉक्स देण्यात आली आहे. असे असतानाही त्यांच्या या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होत नाही. याचा त्रास या नागरिकांना सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
सिलिंडरच्या सबसिडीचा घोळ कायमच
By admin | Updated: February 23, 2015 01:44 IST