पशुसंवर्धन विभागातील अनागोंदी : नांदपुरातील वैरण विकास प्रशिक्षण वर्धा : जिल्ह्यात वैरण विकासाकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत नांदपूर येथे शेतकरी वैरण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. मात्र आता हे शिबिर आपण घेतले नसून ते कृषी विभाग व आत्माने घेतल्याचा कांगावा त्यांच्याकडून होत आहे. तर आर्वीचा तालुका कृषी विभाग व आत्मानेही हा कार्यक्रम घेतला नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. या तिनही संस्था तो प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही नाही घेतला असे सांगत आहे. मग ५५ हजार रुपये खर्चाचा तो कार्यक्रम घेतला कोणी, असा प्रश्न येथे निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे पत्र पशुसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आले आहे. शिवाय या कार्यक्रमाकरित निधी देण्याबाबतचा ठराव पशुसंवर्धन विभागानेच आत्माला सादर केला. त्यांचा हा प्रस्ताव आत्माने नाविण्यपूर्ण योजना असल्याचे म्हणत आत्माने मंजुरी दिली; मात्र आपल्याकडे निधी उपलब्ध नसल्याचेही कळविले. हा प्रस्ताव त्यांनी १७ आॅक्टोबरला सादर केला. तसे मंजूर होण्यापूर्वीच १५ आॅक्टोबरला पशुसंवर्धन विभागाने नांदपूर येथे कार्यक्रम निपटवला. या कार्यक्रमात २०० शेतकऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. दिवसभर असलेल्या या कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांकरिता जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. वास्तविकतेत या कार्यक्रमासंदर्भात कुठलीही निविदा पशुसंवर्धन विभागाच्यावतीने काढली नाही. अशातही कार्यक्रम झाला, मात्र आता तो आपण घेतला नसल्याचे पशुसंवर्धन विभाग सांगत आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सभेतही हिच माहिती त्यांनी दिली. तिथे या कार्यक्रमाबाबत आर्वी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे बोट दाखविले. तर कृषी विभागानेही हा कार्यक्रम घेतला नसल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले. आत्मानेही आपण या कार्यक्रमाला निधी दिला नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.(प्रतिनिधी) मग निधी आला कुठून पत्रिका छापल्या, वरिष्ठांना निमंत्रण पाठविण्यात आले, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. असे असताना या कार्यक्रमाबात पशुसंवर्धन विभाग कृषी विभाग व आत्माकडे बोट दाखवित आहे. त्यांना असे म्हणण्याची गरज का ? हे न उलगडणारे आहे. ५५ हजार रुपये खर्च झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन कोणीच केले नाही. मग नेमका आयोजक कोण, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. खासगी अनुदानातून कार्यक्रम आत्माने अनुदान नाकारल्याने पशुसंवर्धन विभागाने खासगी व्यक्तीकडून मदत मिळवून कार्यक्रम घेतल्याचे सांगण्यात आले. शासनाचा निधी वाचविण्याचा प्रयत्न येथे झाला, असे असताना हा कार्यक्रम आपण घेतला नाही, तो कृषी विभागाने घेतला असे त्यांच्याकडून का सांगण्यात येत आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. नांदपूर येथील कार्यक्रमाकरिता आत्माकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यांनी मंजुरीही दिली होती. मात्र य कार्यक्रमाचा निधी दुसऱ्याच विषयाकरिता गेल्याने तो रखडला होता. यामुळे खासगी व्यक्तीकडून मदत मिळवून तो घेण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर असून या संदर्भातील निधी अद्यापही मिळाला नाही. - डॉ. सतीश राजू, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. वर्धा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात आलेल्या वैरण विकास कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत चांगलाच गोंधळ असल्यो माहिती अधिकारातून उघड झाले आहे. कार्यक्रम खासगी मदतीतून घेतल्याचे पशुसवंर्धन विभागाचे अधिकारी सांगतात तर याच विभागाचे आर्वीचे कार्यालयात हा कार्यक्रम आम्ही नाही तर कृषी विभागाने घेतल्याचे माहिती अधिकारत सांगत आहे. यामुळे यात अपहाराची शंका बळावत आहे.- दीपक कानिटकर, आरटीआय कार्यकर्ता, वर्धा.
कार्यक्रमाबाबत सारेच म्हणतात, आम्ही नाही घेतला!
By admin | Updated: May 23, 2016 02:08 IST