पवनार येथील प्रकार : ग्राम शिक्षण समितीने व्यक्त केला संतापवर्धा : विनोबा भावे यांचे वास्तव्य असलेल्या पवनार या गावातच दारूचा महापूर असतो़ येथील नदीकाठावरील नंदीखेडा परिसरात नेहमीच दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळतो; पण सोमवारी सकाळी गावाच्या मध्यवस्तीत भर बाजार चौकात असलेल्या मुलांच्या प्राथमिक शाळेतच दारूच्या बाटल्यांचा व पाणी पाऊचचा खच आढळल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते़ शिक्षणाच्या पवित्र दालनातच दारूच्या पार्ट्या रंगत असल्याचे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.सोमवारी नेहमीप्रमाणे पालक मुलांना घेऊन शाळेत येत होते़ त्यांना मैदानातच खेळण्याच्या साहित्याजवळ दारूच्या शिशा आढळून आल्या. शिवाय त्यालाच लागून असलेल्या किचनशेडच्या बाजूला भरपूर पाण्याचे पाऊच आढळून आले. यामुळे रात्री येथे जंगी दारूपार्टी झाल्याचे लक्षात आले. शाळेचा परिसर मोठा असल्याने येथे दारू पिणाऱ्यांसाठी ही हक्काची जागा झाली आहे. अनेकदा एक-दोन बाटल्या येथे पडलेल्या आढळून येतात; पण त्या फेकून देऊन त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. सोमवारी मात्र मैदानातच देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि पाणी पाऊचचा खच आढळल्याने पालकांनी संताप व्यक्त करण्यात येत होता़ शाळेच्या मुख्याध्यापिका आणि पालकांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ग्रामशिक्षण समितीची तातडीने बैठक बोलविली. या बैठकीत समितीचे सभापती गणेश बोरकर, मुख्याध्यापिका राऊत, सदस्य ददगाळ, गणेश वाटकर आणि इतरही पालकांची उपस्थिती होती. असा प्रकार पुन्हा खपवून घेतला जाणार नाही, अशा आशयाचा ठराव पारित करून तो ग्रामपंचायतीला देण्यात आला़ शिवाय यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. वर्धा पंचायत समितीलाही हा प्रकार कळविला जाणार असल्याचे ग्रामस्थांद्वारे सांगण्यात आले़(शहर प्रतिनिधी)
प्राथमिक शाळेत दारूच्या बाटल्या
By admin | Updated: July 7, 2014 23:42 IST