सुरेश उपाध्याय : अंमली पदार्थ विरोधी दिवसानिमित्त जनजागृती कार्यक्रमदेवळी : वाईटाकडे सहज प्रवृत्ती या उक्तीप्रमाणे तरूणाई मोठ्या प्रमाणात अंमली व मादक पदार्थांकडे आकर्षित होत आहे. सशक्त समाजासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी सुजाण व देशाभिमान असणाऱ्या तरूणाईची गरज आहे. यासाठी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे. व्यसनमुक्त तरूणाईच देशाची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन स्थानिक एनएसएनजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय यांनी व्यक्त केले.महाविद्यालयातील एन.सी.सी. पथकाच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. उपाध्याय बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गोपाल हेलोंडे व एन.सी.सी. अधिकारी प्रा. मोहन गुजरकर उपस्थित होते. मादक पदार्थ विरोधी दिवसानिमित्त गटचर्चा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात गटांचे प्रमुख सार्जेंट कोमल गोमासे, कॅडेट सुमीर डोंगरे, आशिष कांबळे, राजू सुरकार व कोमल जांभुळकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी छात्र सैनिकांनी महाविद्यालय परिसरात से नो टू ड्रग्ज, अंमली पदार्थाचे सेवन म्हणजे मृत्यू, मादक पदार्थाचे सेवन टाळा असे फलक दर्शवून जानजागृती केली.प्रा. हेलोंडे म्हणाले, वाईट व्यसन जीवनाची राखरांगोळी करते. मद्यप्राशन, सिगारेट, तंबाखू, गुटखा व ड्रग्जचे सेवन शरीराकरिता हानिकारक असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक एन.सी.सी. अधिकारी प्रा. मोहन गुजरकर यांनी केले. संचालन आश्विनी घोडखांदे हिने तर आभार रवी बकाले याने मानले. यावेळी सूरज पोटफोटे, राहुल भगत, वैभव भोयर, परचाके, साकीब पठाण, प्रवीण येणूरकर, दिशा खैरकार, आश्विनी मुनेश्वर, करिश्मा वाघमारे, उमा मसराम उपस्थित होते.(प्रतिनिधी)
व्यसनमुक्त तरूणाई देशाची खरी संपत्ती
By admin | Updated: June 29, 2015 02:39 IST