महाबळा येथील प्रकार : तलाठी व कोतवालावर कारवाई करण्याची मागणीकेळझर : खनिज वाहतूक परवाना (रॉयल्टी) असतानाही ट्रॅक्टर चालक व मालकावर महाबळा येथे तलाठी व कोतवालाने कारवाई केल्याची घटना मंगळवारी घडली. त्यामुळे संबंधितांवार कारवाईची मागणी होत आहे. केळझर येथील रमेश नथ्थुजी कोपरकर यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर त्यांचा पुतण्या मंगेश महादेव कोपरकर हा चालक आहे. मंगळवार १४ जून रोजी महाबळा येथे गिट्टीने भरलेला ट्रॅक्टर क्र. एमएच ३२ ए ७७०६ खाली करण्यात आला. यानंतर काही वेळातच महाबळाचे तलाठी व कोतवालाने खनीज वाहतूक परवाना नसल्याच्या सबबीवर खाली ट्रॅक्टर चालक व मालकावर सदर कारवाई केली. वास्तविक, चालकाकडे रॉयल्टी पास असतानाही काहीही ऐकून न घेता कोतवालाने ट्रॅक्टर चालकाकडे पैशाची मागणी केल्याचा आरोप कोपरकर यांनी केला. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे अकारण ही कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून महाबळा येथील कोतवालावर कार्यवाही करण्याची मागणी रमेश कोपरकर यांनी केली आहे.(वार्ताहर)
रॉयल्टी असतानाही ट्रॅक्टर मालकावर कारवाई
By admin | Updated: June 18, 2016 01:24 IST