वर्धा : नर्सिंगच्या अॅडमिशनकरिता होत असलेल्या प्रवेशासंदर्भात केलेल्या पत्रव्यवहाराचा पाठपुरावा करण्यासाठी गेलेल्या खासदाराच्या स्वीय सहायकास सेवाग्राम रूग्णालयाच्या सचिवांनी अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे दुखावलेल्या स्वीय सहायकाने अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात रुग्णालयाचे सचिव गर्ग यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दाखल तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी नर्सिंग अॅडमिशन संदर्भात खा. रामदास तडस यांच्याकडून सेवाग्राम रुग्णालयाचे सचिव गर्ग यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. या पत्रव्यवहाराचा पाठपुरावा करण्याकरिता खासदारांचे सहायक म्हणून कार्यरत असलेले सारंग राजेंद्र रघाटाटे (२८) सेवाग्राम रूग्णालयाचे सचिव गर्ग यांच्याकडे गेले. यावेळी त्यांनी गर्ग यांच्या कार्यालयात प्रवेश घेण्याकरिता परवानगी मागितली. परंतु रघाटाटे यांना परवानगी तर दिली नाहीच उलट रघाटाटे यांना धक्का मारून गर्ग निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे दुखावलेल्या रघाटाटे यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी सेवाग्राम ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. याबाबत गर्ग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. घटनेचा तपास सेवाग्राम पोलीस करीत आहे.(शहर प्रतिनिधी)
खासदारांच्या स्वीय सहायकाला अपमानास्पद वागणूक
By admin | Updated: July 23, 2015 02:11 IST