लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीमुळे वर्धा जिल्ह्यातील २ हजार ४६८ घरांवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यात आले असून त्यांची स्थापित वीजनिर्मिती क्षमता ९.२४ मेगावॅट आहे. सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यधर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेत घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीज निर्माण केली जाते. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते.
घरगुती ग्राहकांच्या मदतीसाठी गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ही योजना सुरू केली होती. ज्या ग्राहकांचा वीजवापर महिना ३०० युनिट्सपर्यंत आहे. सध्या शहरासह ग्रामीण भागातही सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींना मिळणार प्रोत्साहनासाठी निधी
- ग्रामीण भागातील ग्राहकांना सौर पॅनल्स बसविण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना निधी दिला जात आहे. तसेच ग्राहकांसाठी माफक व्यजदरात कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेतून ग्रामपंचायतींनाही प्रोत्साहन दिले जाईल.
- वर्धा मंडलात पाच हजार ८७७ ग्राहकांचा समावेश असून लवकरच या ग्राहकांच्या घराच्या छातावर देखील सौर ऊर्जा प्रकल्प वीज निर्मितीसाठी सज्ज होणार आहे. तसेच चिचघाट राठी या गावाचाही समावेश आहे.
ऊर्जानिर्मितीस मिळतेय चालना... मोफत वीज आणि उत्पन्नाचा स्त्रोत या योजनेमुळे जिल्ह्यातील ग्राहकांचा आर्थिक भार कमी होण्यासह, स्वच्छ ऊर्जानिर्मितीस चालना मिळत आहे. तसेच ग्राहकांची बचत होण्यास मदत मिळणार असल्यामुळे या योजनेला अनेकांची पसंती मिळत आहे. महावितरणने नुकताच या योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढणार असल्याची शक्यता महावितरणने वर्तविली आहे. महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे ऊर्जानिर्मितीस चालना मिळतेय
वीजबिल येतेय शून्य ग्राहकांना तीन किलोवॉट क्षमतेसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळते. ग्राहकांना मदत करण्यासाठी महावितरणतर्फे नेट मीटर मोफत दिले जाते. योजनेसाठी नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइट देखील सुरु करण्यात आली असून वीज ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले.