महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध आजारांमुळे अंथरुणावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला घरपोच कोविडची लस देण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. याच धोरणासह शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून शनिवार, ७ ऑगस्टपासून जिल्ह्यात अंथरुणावर असलेल्या (बेडरिडन) लाभार्थ्यांना काेरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात झाली आहे. ७, ९ व १० ऑगस्ट या तीन दिवशी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून तब्बल ९० बेडरिडन लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात आरोग्य विभागाने विशेष सर्वेक्षण राबवून एकूण २ हजार २०५ बेडरिडन लाभार्थी आहेत, याची माहिती गोळा केली. त्यानंतर आता प्रत्यक्षात लसीकरण केले जात आहे.
बेडरिन लाभार्थ्यांना दिली जातेय कोव्हॅक्सिन- बेडरिडन लाभार्थ्यांना घरपोच लस दिली जात आहे. या लाभार्थ्यांना कोविडमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी असलेली कोव्हॅक्सिन ही लस दिली जात असल्याचे सांगण्यात आले. बेडरिडन लाभार्थ्यांनीही घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करीत स्वत: कोविडची लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
असा दिला आहे लससाठा- जिल्ह्यात २८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्रत्येक प्राथमिक आरेाग्य केंद्राला बेडरिडन लाभार्थ्यांसाठी कोव्हॅक्सिन लसीचे ४० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर वर्धा व हिंगणघाट या मोठ्या शहरांसाठी लसीचे ३०० डोस तसेच पुलगाव आणि आर्वी या मध्यम लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी लसीचे ४० डोस सुरुवातीला देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
शनिवार ७ ऑगस्टपासून जिल्ह्यात बेडरिडन लाभार्थ्यांना घरपोच कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. या विशेष मोहिमेसाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना लससाठा उपलब्ध करून देण्यात आला असून, जशी मागणी होईल तसा लससाठा उपलब्ध करून दिल्या जाईल. कुठलाही बेडरिडन लाभार्थी लसीपासून वंचित राहू नये, यासाठी आरेाग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. बेडरिडन लाभार्थ्यांनीही कोविडची लस घेऊन या विशेष मोहिमेला यशस्वी करावे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.