सहकार कार्यालयाचे पत्र : मोठ्या थकबाकीदारांकडून वसुलीकरिता कारवाईचे आदेशवर्धा : आर्थिक अडचणीमुळे येथील जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईस आली. या बँकेतील ५० कर्जदारांकडे ९८ कोटी २४ लाख ५४ हजार रुपये थकले आहे. त्याची वसुली करण्याच्या सूचना सहकार खात्याच्यावतीने एका पत्रातून देण्यात आल्या आहेत. असे पत्र जिल्हाधिकारी व उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नसून याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आपली बँक म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत नागरिकांनी त्यांच्या ठेवी ठेवल्या. त्या आपल्या कामाच्या वेळी परत मिळतील अशी अपेक्षा असताना ऐनवेळेवर बँक आर्थिक अडचणीत आली. यामुळे अनेकांच्या रकमा यात अडल्याने ठेविदार आर्थिक अडचणीत आले. या बँकेने कधी या मोठ्या कर्जदारांकडून कधी वसुली केली नसल्याचे दिसून आले आले आहे. या बँकेला उभारी देण्याकरिता शासनाच्यावतीने नुकतेच ५० कोटी रुपये देण्यात आले आहे. बँकेच्या या स्थितीमुळे जिल्ह्यातील नागरिक आर्थिक अडचणीत सापडल्याची माहिती वर्धा विभागाचे आ. डॉ. पंकज भोयर व हिंगणघाट विभागाचे आ. समीर कुणावार यांनी मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे दिली. शिवाय त्यांना बँकेच्या मोठ्या ५० थकबाकीदरांची यादीही दिली. या निवेदनात या थकबाकीदारांकडून ही रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणीही केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सदर पत्र सहकार व पणन मंत्रालयाकडे पाठविले. यावर मंत्रालयाने चौकशी करून या मोठ्या थकबाकीदरांकडून वसुली करण्यासंदर्भात कायदेशीर कारवाई करावी असे पत्र जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविले आहे. या पत्रानुसार जिल्हा प्रशासन व बँक व्यवस्थापन या मोठ्या थकबाकीदरांकडून वसुली करते वा पणन मंत्रालयाचे पत्र केवळ पत्रच राहते याकडे जिल्ह्यातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.(प्रतिनिधी)
५० कर्जदारांकडे थकले ९८.२५ कोटी
By admin | Updated: February 29, 2016 01:36 IST