बीएसएनएल कार्यालयात चोरी वर्धा : भारत संचार निगमच्या मुख्य कार्यालयातून ७ लाख २८ हजार रुपये किमतीच्या तीन मशीन चोरट्यांनी लंपास केल्या. तक्रार मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ठसेतज्ञांनी बोटांचे ठसे घेतले.झांसी राणी चौकातील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयाच्या दुसऱ्या प्रवेश द्वारावर ओएफसी स्टेशन आहे. तेथे प्रकाशीय तंतु केबल अनुरक्षण केंद्र असून यात ४ लाख ७० हजार ५०० रुपये किमतीची लाइसिंग मशीन, २ लाख ५८ हजार ३९६ रुपये किमतीची आॅप्टिकल टाइम डोमेन रिफ्लेक्टर मशीन व २५ हजार रुपये किमतीची डायमंड कटर मशीन ठेवली होती. कर्मचारी गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता कर्तव्य आटोपून गेले. शनिवारी सकाळी ते परत आले असता चोरी उघड झाली. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. तक्रारीवरून शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले व पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.(कार्यालय प्रतिनिधी)किल्लीवरून लागणार चोराचा छडाया कार्यालयाच्या चाव्या दुसऱ्या खोलीत ठेवल्या होत्या. चोरांनी थेट त्या खोलीच्या दाराचा कोंडा तोडून केवळ एकच किल्ली घेतली व महागड्या मशीन ठेवून असलेल्या खोलीचे दार उघडले. सामान्य चोर हे काम करू शकत नाही. तांत्रिक माहिती असलेला व्यक्तीच त्या मशीनचा वापर करू शकतो. यावरून चोराला मशीनची माहिती होती. ठसेतज्ज्ञांच्या मदतीने चोर गवसेल, असे पीएसआय गणेश इंगोले यांनी सांगितले.
७.२८ लाखांच्या मशीन लंपास
By admin | Updated: November 12, 2016 01:09 IST