वर्धा : महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुणित वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे; पण जिल्ह्यात खुली असल्यागत दारू विकली जाते. यामुळे पोलीस यंत्रणेला अन्य गुन्ह्यांसोबतच दारूविक्रीकडेही लक्ष द्यावे लागते. सध्या जिल्ह्यात दारूविके्रत्यांविरूद्ध धडक मोहिमच राबविली जात आहे. अशीच बाहेर जिल्ह्यातून दारू आणली जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी करंजी (भोगे) येथे सापळा रचला. यात कारसह ५.६५ लाख रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेने केली.रामनगर येथील सागर ठाकूर हा त्याच्या पांढऱ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या कारद्वारे शेडगाव येथून वर्धेकडे दारू घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. यावरून करंजी (भोगे) येथे सापळा रचण्यात आला. दरम्यान, मिळालेल्या माहितीप्रमाणे क्रमांक नसलेली कार आढळून आली. सदर कार पोलिसांनी थांबविली. वाहन चालकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सागर भरतसीग ठाकूर (३५) रा. सर्कस ग्राऊंड जवळ रामनगर वर्धा, असे नाव सांगितले. सदर कारची झडती घेतली असता ७ बॉक्समध्ये देशी-विदेशी दारू किंमत ६५ हजार रुपये आढळून आली. यावरून पोलिसांनी कार व दारू एकूण किंमत ५ लाख ६५ हजारे रुपये जप्त केली. या प्रकरणी आरोपी विरूद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) (ई), ७७ (अ), सहकलम ३ (१)/१८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३०/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे यांच्या निर्देशानुसार सहायक पोलीस निरीक्षक ए.एम. जिट्टावार, सहायक फौजदार अशोक साबळे, हवालदार नामदेव किटे, राजू ठाकूर, वैभव कट्टोजवार, हरिदास काकड, दीपक जाधव, अमित शुक्ला, महेंद्र अढाऊ आदींनी केली. जिल्ह्यात दररोज लाखो रुपयांचा दारूसाठा जप्त केला जात असताना विक्री कमी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)
कारसह ५.६५ लाखांची दारू जप्त
By admin | Updated: August 21, 2015 02:32 IST