राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : जिल्ह्यात ओमायकॉनचा एकही रुग्ण सापडला नसला तरी सध्या कोविडच्या ओमायकॉन या प्रकाराने सर्वांचीच चिंता वाढविली आहे. जिल्ह्यात ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात कार्यक्रमांची माहिती प्रशासनाला देत कार्यक्रमाबाबतची रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे लग्नसोहळ्यांचा कार्यक्रम आहे. शिवाय ज्यांनी ५०० हून अधिक पत्रिका वाटल्या त्यांच्या समोर आता मोजक्यात नातेवाईकांसह निकटवर्तीयांना कार्यक्रमाला कसे बोलवावे हा प्रश्न आहे.
बंदिस्त सभागृहात शंभरपेक्षा जास्त नकोच- ओमीक्रोनच्या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बंद जागेत होणाऱ्या समारंभात शंभरपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असे निर्देश दिले आहेत. पण लग्नाच्या ५०० हून अधिक पत्रिका वाटप केलेल्या व्यक्तींसमोर नेमके १०० व्यक्ती कोणते बोलवावेत हा प्रश्न आहे.
वधू-वर पित्यांना धडकी
- जानेवारी महिन्यात मुलीचा विवाह असून मंगल कार्यालय, केटरर्स, घोडा, डेकोरेशन आदी बुक केले आहे. बहूतांश व्यक्तींना लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यात आल्या असून नुकताच जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे आता मोजक्याच व्यक्तींना लग्नासाठी कसे बोलवावे हा मोठा प्रश्न आहे, असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर वधू पित्याने सांगितले.
- फेब्रुवारी महिन्यात मुलाचा विवाह असून संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मोजक्या व्यक्तींच्या उपस्थित लग्न साेहळा करावा की लग्न पुढे ढकलायचे काय असा विचार सुरू असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका वर पित्याने सांगितले.
मंगल कार्यालयाच्या अडचणी वाढल्या
विवाह सोहळ्यांसाठी अनेकांनी मंगल कार्यालय आरक्षित केले असले तरी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक मंगल कार्यालयाची क्षमता निश्चित केली जाणार आहे. मंगल कार्यालयाच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० व्यक्तीच लग्न सोहळ्यांना उपस्थित राहू शकणार असल्याने मंगल कार्यालय मालकांच्या अडचणीत भर पडली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमांसाठी प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे.
जानेवारीत मुहूर्त- जानेवारी महिन्यात १७, १८, १९, २०, २३, २४, २९ आणि फेब्रुवारी महिन्याच्या २, ३, ५, ६, ११, १३, १४, १६, १७, १९, २१,२८ तर मार्च महिन्यातील १, २, ५, ६, १०, ११, १४, १५, १६, १८ या लग्न मुहूर्ताच्या दिवशी मोजक्यात व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न सोहळा कसा पार पाडावा असा प्रश्न अनेकांसमोर आहे. त्यासाठी नियोजन केले जात आहे.