वैद्यकीय जनजागृती मंचाचा उपक्रम : एक हजार कुटुंबांना दिलासा कार्ड, ३२३० रुग्णांनी घेतला मोफत सेवेचा लाभवर्धा : वैद्यकीय जनजागृती मंचातर्फे गत दोन महिन्यांपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ‘वैद्यकीय दिलासा कार्ड’चे वाटप करण्यात येत आहे. आजपर्यंत एक हजार कुटुंबांना कार्डचे वाटप करण्यात आले. शिवाय मातोश्री वृद्धाश्रमातील ३० माता-पित्यांच्या आरोग्याची जबाबदारीही वैद्यकीय जनजागृती मंचाने स्वीकारली आहे.या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. नितीन मेसकर, डॉ. प्रवीण सातपुते असून समितीमध्ये डॉ. यशवंत हिवंज, डॉ. नितीन भलमे, हृदयरोग तज्ञ डॉ. राजेश सरोदे आहेत. समितीद्वारे वृद्धाश्रमातील ३० माता-पित्यांचे ईसीजी, ब्लडशुगर व अन्य तपासणी करून प्रकरण ‘हिस्ट्री रेकॉर्ड फाईल’ बनविण्यात आल्या आहे. डॉ. प्रदीप सुने यांनी तेथील दोन रुग्णांची मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी निवड केली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी ८ ते ९ दरम्यान मंचाचे डॉक्टर्स सर्वांची तपासणी करतात. त्यांना आवश्यक सर्व वैद्यकीय सेवा पुरवित आहेत. वृद्ध सुश्रृषा कशी करावी, याचे मार्गदर्शन करणारा फलक मातोश्री वृद्धाश्रम येथे लावण्यात आला आहे. दिलासा कार्डमध्ये वर्धा व नागपूर येथील ६५ तज्ञ डॉक्टरांची यादी दिली आहे. यातील डॉक्टरांना कार्ड दाखविल्यास संबंधित रुग्णांचे तपासणी शुल्क माफ केले जाते. अन्य सवलती तपासणी करणारे मंचचे सदस्य डॉक्टर रुग्णाच्या बाबींचा विचार करून ठरवितात. आतापर्यंत एक हजार कार्ड वितरित करण्यात आले असून ३२३० रुग्णांनी सेवेचा लाभ घेतल्याचे डॉ. हिवंज यांनी सांगितले. हे कार्ड न मिळालेल्या कुटुंबांनी कागदपत्रासह मंचाशी संपर्क साधवा, असे आवाहन मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)‘आमला’ दिलासा कार्डचेही करणार वितरणआत्महत्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ८०० वस्तीच्या ‘आमला’ हे गाव सहा महिन्यांत स्वावलंबी बनविण्याचा संकल्प ‘नाम’ ने केला. वैद्यकीय सेवेकरिता मंचाने जबाबदारी घ्यावी, असे आवाहन नाना-मकरंद यांनी केले होते. त्यानुसार ‘आमला दिलासा कार्ड’ देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. प्रशांत वाडिभस्मे असून समितीमध्ये डॉ. शंतनू चव्हाण, डॉ. राजेंद्र पुनसे, डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. महेंद्र भगत आहेत. रविवारी दुपारी १२ वाजता आमला येथे या कार्डचे वितरण होणार आहे. डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू व चंडीपूरा आजारातील प्रतिबंधात्मक जनजागरणही केले जाणार आहे. ‘वैद्यकीय दिलासा कार्ड’ प्रकल्प प्रमुख डॉ. आनंद गावढकर, डॉ. प्रशांत वाडिभस्मे, डॉ. महेंद्र भगत, डॉ. संजय शेंदरे वायगाव, डॉ. चंद्रकांत जाधव सेलू यांच्याकडे उपलब्ध आहेत. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील समस्य ते कागदपत्र सादर करून प्राप्त करू शकणार असल्याची माहितीही मंचाने दिली.
वृद्धाश्रमातील ३० माता-पित्यांची स्वीकारली जबाबदारी
By admin | Updated: December 6, 2015 02:14 IST