जनजागृतीसाठी विशेष मोहीम : गावागावात नागरिकांना देणार माहितीवर्धा : जिल्ह्यातच नाही तर राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. यात वर्धा जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत १ हजार ५९६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी २७१ जणांना डेंग्यूने ग्रासल्याचे समोर आले आहे. या आजारापासून जिल्ह्यातील नागरिकांची मुक्तता करावा याकरिता जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या; मात्र त्या कुठेतरी कमी पडत असून त्याचा पाहिजे तसा उपयोग होत नसल्याचे समोर आले आहे.अस्वच्छतेतून हा रोग उद्भवत असून केवळ आरोग्य विभागाच्यावतीने उपाययोजना करून या रोगावर आळा बसणे शक्य नाही. यामुळे नागरिकांना यात सहभागी करण्याची मोहीम आरोग्य विभागाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. यात शाळा महाविद्यालये व गावकऱ्यांचा सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात गावागावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दिवाळीच्या पूर्वी शाळाशाळांत कोरडा दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. हिच मोहीम पुन्हा सुरू करण्यात येत आहे. ही मोहीम १० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. ती १५ दिवस सुरू राहणार आहे. यात गावागावात जावून या रोगावर आळा बसविण्याकरिता जनजागृती करण्याकरिता मार्गदर्शन करण्यात येत आहे. शहरी भागात आता खासगी रुग्णालय चालविणाऱ्या डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावतीने शहरी भागात असलेल्या झोपडपट्टीत नागरिकांना माहिती देण्याकरिता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात डेंग्यूचे २७१ रुग्ण
By admin | Updated: November 9, 2014 23:16 IST