गहू लोळला : सेलूत घरांची पडझड; संत्रा, केळी व पपईच्या बागांचे नुकसान वर्धा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सायंकाळच्यावेळी येत असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. शनिवारी रात्री आलेल्या पावसात जिल्ह्यातील २५ गावांना गारपिटीचा तडाखा बसल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारीही पावसाचा जोर कायम होता. कारंजा तालुक्यातील सेलगाव (लवने) येथे सायंकाळी पाऊस आला. शनिवारी सेलू तालुक्यातील काही घरांची पडझड झाली तर शेतातील गहू लोळला आहे. या गारपिटीमुळे संत्रा, केळी व पपईच्या बागांना चांगलाच फटका बसला. कृषी विभागाच्यावतीने त्याचा सर्व्हे अद्यापही सुरू असल्याने नुकसानीचा आकडा कळू शकला नाही.गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शेतातील गहू सवंगणीच्या मार्गावर असताना अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसभर वातावरणात पाऊस येईल, असे कुठलेही संकेत नसताना सायंकाळी अचानक पावसाचे आगमन होते. शुक्रवारी आलेल्या पावसात वर्धा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. शनिवारी आलेल्या पावसाने सेलू तालुक्याचे चांगलेच नुकसान केले. या भागात प्रारंभी साधारण आलेला पाऊस रात्री चांगलाच बरसला. पावसासह आलेल्या गारपिटीमुळे येथील केळीच्या बागांचे नुकसान झाले तर झडशी भागात पपईच्या बागातील झाले उन्मळून पडली. शिवाय या भागात काही घरांवरील छतही उडाले. जिल्हा परिषद क्षेत्रानुसार एकूण तीन क्षेत्रातील २५ गावांना गारपिटीने चांगलेच झोडपल्याची माहिती आहे. यात वर्धा विभागातील दोन गावे, आंजी(मोठी) १९ तर सेलू भागातील चार गावांचा समावेश आहे. पावसासह असलेला वारा व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान करून ेगेला. येत्या दहा दिवसात बऱ्याच शेतातील पीक निघण्याची शक्यता होती. असे असताना या गारपिटीमुळे पिकाला चांगलाच फटका बसला. जिल्ह्यात हा अवकाळी पाऊस दोन दिवस आणखी येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क) गव्हाचा रंग व चमक धोक्यातया पावसामुळे व गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या गव्हाचा रंग व चमक जाणार आहे. यामुळे गव्हाच्या किंमती कमी घसरणे शक्य असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. खरीपपाठोपाठ रबी पिकावरही अस्मानी संकट आल्याने शेतकरी तुर्तास हवालदिल झाला आहे.भाजीपाल्याला फटकाभाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने स्वस्त मिळणारा भाजीपाला आता महागण्याचे संकेत आहेत. सांबार, मिरची, वांगे, फुलकोबी या पिकाला गारांचा चांगलाच तडाखा बसला आहे. बांधावर जावून सर्व्हे करण्याची मागणीशासकीय यंत्रणेने शेताच्या बांधावर जावून सर्वेक्षण केल्यास नुकसानीची खरीखुरी आकडेवारी समोर येईल. त्यामुळे नुकसानीचा सर्व्हे करताना कर्मचाऱ्यांनी काळजी घेवून शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी आहे.कृषी विभागाचा सर्व्हे सुरू सतत दोन दिवस झालेल्या या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत आहे. अशात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाच्यावतीने सर्व्हेच्या कामाला प्रारंभ झाला आहे. सोमवारी दुपारपर्यंत झालेल्या नुकसानाची माहिती मिळेल असे कृषी त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
२५ गावांना गारपिटीचा तडाखा
By admin | Updated: February 29, 2016 01:35 IST